मी तेंव्हा
दहावीत होतो. शाळा आणि अभ्यासापेक्षा इतर उद्योगात मी जास्त रमत असे. एक दिवस आई
घरी आल्यावर म्हणाली, “कालिकत युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी ‘कारुथ दैवथे थेडी’
नावाचं एक नाटक केलं आहे. जी. शंकर पिल्लई यांचं ते नाटक आहे. प्रा. रामानुजम
नावाचे एक फार चांगले आणि मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांनी ते बसवलं आहे. त्यांचा
यावर्षीच्या पृथ्वी महोत्सवात प्रयोग होणार आहे. तेंव्हा मुंबईला जाताजाता पुण्यात
त्यांचा प्रयोग करता येईल का असा प्रयत्न चालू आहे.” माझ्यासाठी ही सगळीच नावं
नवीन होती. हा प्रयोग पुण्यात व्हायला हवा असं वाटत असलेल्यांमध्ये प्रा. सतीश
बहादूर आणि श्री. रवींद्र सुर्वे यांचाही समावेश होता. मी एक स्वाभाविकपणे उपलब्ध
असलेला स्वयंसेवक होतो!
या नाटकाच्या
नावाची मला फार गम्मत वाटत होती. आणि एक आश्चर्यकारक आकर्षण सुद्धा. ‘कारुथ दैवथे
थेडी...’ तो शेवटचा ‘थेडी’ म्हणायला मला मजा वाटायची. त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ
‘इन सर्च ऑफ ब्लॅक गॉड’ असा होता. हा काळा देव कसा असेल? काय असेल या नाटकात?
आपल्याला नक्की काय बघायला मिळणार आहे? असे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत
होते.
फिल्म
इन्स्टिट्यूटच्या आवारात या नाटकाचा प्रयोग करायचा असं ठरलं. माझ्यासाठी हा सगळाच
अनुभव नवीन होता. आतापावेतो फिल्म इन्स्टिट्यूटच्या आवारात मी एकतर आईबरोबर
बहादूरकाकांना भेटायला किंवा एखाद्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला जात होतो. यावेळी
तिथे होत असलेल्या एका कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून जाणार होतो याची मला मजाही
वाटत होती.
प्रयोगाच्या
आदल्या दिवशी संध्याकाळी सगळा चमू केरळहून पुण्यात पोहोचला. पुणे स्टेशन वरून
सगळ्यांना निवास व्यवस्था होती तिथे घेऊन गेलो. बरोबर सुर्वे काका होतेच. भाषा
एकमेकांना कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. रात्री सगळे जण जेवायला हॉटेलच्या
डायनिंग हॉलमध्ये एकत्र आले. एकमेकांची नावं कळत होती. बाकी फारसा काही प्रकाश पडत
नव्हता. ते सगळे जण खूपच एक्साईट झाले होते. त्यांना खूप मजा येत होती हे कळत
होतं. हे सगळे मिळून जे काही करताहेत ते फार मस्त आहे असं सारखं वाटत होतं.
जेवताना माझ्या शेजारी बसलेला एकजण बराच वेळ त्याच्या पलीकडे बसलेल्या नटाशी
काहीतरी बोलत होता. बोलताना मधून मधून ते माझ्याकडे आणि माझ्या ताटाकडे बघत होते!
मला काही कळेना. त्यांनी तिथल्या वेटरला बोलावून बराच वेळ काहीतरी सांगायचा
प्रयत्न केला. त्याला काहीतरी हवं होतं, पण ते कसं सांगायचं, त्यासाठी मराठी शब्द
कोणता हे काही त्याला कळेना. शेवटी त्यानं माझ्याकडे मदतीच्य आशेनं पाहिलं.
मलासुद्धा काहीही कळलं नव्हतं. माझा प्रश्नार्थक चेहरा बघून त्यानं माझ्या ताटाकडे
बोट दाखवलं. तिथे दही होतं. मी मोठ्यानं म्हणालो, “दही...!!!” आणि त्या सगळ्या
हॉलमध्ये एकदम सगळीकडून ‘दही, दही...’ असा पुकारा झाला! त्या सगळ्यांनाच दही हवं
होतं...!
दुसऱ्या दिवशी
सकाळी प्रयोगाच्या तयारीसाठी म्हणून मी नऊ वाजता फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये
पोहोचलो. नाटकाचे दिग्दर्शक प्रो. रामानुजम तिथे आले होतेच. मी त्यांच्या समोर
जाऊन उभा राहिलो. त्यांनी तिथेच करायच्या काही बारीक सारीक गोष्टींच्या सूचना
दिल्या. मग मला म्हणाले. “आय नीड अ स्मॉल हेल्प फ्रॉम यू.” मी मदत करायची वाटच
पहात होतो. मी म्हणालो सांगा काय हवंय ते. ते म्हणाले, “आम्हाला शेण पाहिजे...” मी
उडालोच. शेण? शहरात वाढलेल्या माझ्यासारख्या मुलाचा शेणाशी फारसा संबंध आला
नव्हता. मी विचारलं, “किती हवंय?” त्यावर त्यांचं उत्तर ऐकून मी हबकलोच. ते
म्हणाले, “एक बैलगाडी भरून आण.” माझा चेहरा बहुतेक कसनुसा झाला असावा. प्रा.
रामानुजम हसायला लागले. ते म्हणाले, “अरे किती शेण लागणार... स्टेजची एरिया
आपल्याला सारवून घ्यायची आहे. एक बादली म्हणजे पुष्कळ झालं.” आजपावेतो स्टेज झाडून
घेतात हे माहित होतं. स्टेज सारवून घेतात हे पहिल्यांदाच ऐकत होतो. पुन्हा एकदा
नाटकाविषयी माझी उत्सुकता वाढली.
संध्याकाळी
प्रयोगाची वेळ जवळ आली. फिल्म इन्स्टिट्यूटच्या आवारामध्ये एका मोकळ्या चौकात
प्रयोग होता. काळ्या रंगात रंगवलेल्या लेव्हल्स, मी कधीच न पाहिलेल्या पद्धतीची
प्रकाश योजना, शेणाचा वास या सगळ्या गोष्टी वेगळीच वातावरण निर्मिती करत होत्या.
बघता बघता तो चौक प्रेक्षकांनी भरून गेला. सूर्यास्त झाला. संधी प्रकश संपत आला
आणि तालवाद्याचा पहिला ठोका घुमला. आखूड धोतर घातलेले नट नृत्यात्मक हालचाली करीत
रंगमंचावर प्रवेश करते झाले. वरचं शरीर उघडं. त्यांच्यातच एक विदुषक. सगळ्यांच्या
हातात एक एक काठी. पुढचा संपूर्ण प्रयोग ही दृश्यात्मक पर्वणी होती. व्हिज्युअल
ट्रीट. बांधेसूद आणि लवचिक शरीरं, त्यांच्यातून निर्माण होणारे वेगवेगळे आकार,
काठ्यांचा कल्पनेच्या पलीकडे केलेला वापर, अनेक दृष्यबंध, विदुषकाचा अपवाद वगळता
प्रामुख्यानं दिसणारा काळा आणि पांढरा रंग... माझ्यासाठी ते सगळं जादूचं जग होतं.
काठ्यांचा वापर करून तयार केलेली नदी, ती नदी ओलांडण्यासाठी तयार केलेला कच्चा पूल
आणि तो पूल ओलांडून जाताना पाण्यात पडून वाहून जाणारं पात्रं हे सगळं बघताना मी
केंव्हाच त्यांच्या जगात पोहोचलो होतो. इथे भाषेच काहीच प्रश्न नव्हता. जणू काही
मला ती भाषा येतंच होती. समजणं म्हणजे काय हे पण नव्यानं समजत होतं. नाटकाची भाषा
ही भाषेपालीकडची असते म्हणजे काय हे तेंव्हा थोडंसं कळल्यासारखं वाटलं. काळा आणि
पांढरा रंग किती आकर्षक असू शकतात, काय काय सांगू शकतात, किती परिणामकारक असू
शकतात याचं ते उत्तम उदाहरण होतं. विदुषक हे पात्रं असंच वेगळं होतं. प्रयोगाच्या
सुरवातीला अतिशय मजा करणारा विदुषक हळू हळू केंव्हा गंभीर होत गेला ते समजलंच
नव्हतं. शेवटी जेंव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तेंव्हा लक्षात आलं की
अरेच्च्या, हा रडतोय. रडणारा विदुषकही मी पहिल्यांदाच पहात होतो.
प्रयोग संपला तरी
नाटक अजून संपलं नव्हतं. प्रयोगानंतर सगळे मजेत होते. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली.
सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले. आणि रात्री आमच्या घरातला फोन खणखणला. प्रा.
रामानुजम यांना हार्ट अॅटॅक आला होता. त्याना लगेच जहांगीरमध्ये अॅडमीट करावं
लागलं. पुढचे काही दिवस त्यांच्या सेवेत गेले. त्यांना फार बोलायला परवानगी
नव्हती. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी एक रघू नावाचा विद्यार्थी त्यांच्याबरोबर
थांबला. बाकीचे सगळे दुसऱ्याच दिवशी पृथ्वी महोत्सवातल्या प्रयोगासाठी रवाना झाले.
या प्रयोगाचा
माझ्यावर खूपच परिणाम झाला. आपण बघतो तेवढंच नाटक असं नाही. आपल्याच देशात
वेगवेगळ्या भागात नाटकवाले लोक आहेत. आणि ते सगळे वेगवेगळ्या प्रकारची नाटकं
करतात, प्रयोग करतात हे लक्षात आलं. नाटक, आणि नाटकामाधली नाट्यात्मकता आणि
त्यामधून निर्माण होणारी नाटकाची भाषा याचा थोडा थोडा अर्थ लागू लागला. शब्द,
शब्दांचं महत्व आणि शब्दांपलीकडे जाण्याची जादू या गोष्टी दिसायला लागल्या.
‘नाटक असं असतं
राजा’ असं कुणीतरी म्हटल्यासारखं वाटलं...
('कारुथ दैवथे थेडी' या नाटकाचा एक खूप जुना फोटो)
ताजा कलम: प्रा.
रामानुजम यांच्याबरोबर राहिलेला त्यांचा विद्यार्थी डी. रघूथमम याच्याशी माझा काही
काळ पत्रव्यवहार झाला. पण एका लहान मुलाबरोबर तो तरी किती पत्र लिहिणार! नंतर
पुन्हा २००६ मध्ये एका वेगळ्या कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा रघूची अचानक भेट
झाली. तो केरळ मधल्या ‘अभिनय थिएटर’ या संस्थेचा संस्थापक असून रंगभूमीवर
सातत्यानं कार्यरत असलेला एक महत्वाचा कलावंत आहे.

No comments:
Post a Comment