कोर्ट



काल रात्री कोर्ट पहिला.

उत्तम चित्रपट म्हटल्यावर सर्वसामान्यपणे ज्या असामान्य कल्पना मनात येऊ शकतात त्यामध्ये कुठेच न बसतासुद्धा एक उत्तम चित्रपट. हा पहिल्याने समाधान वगैरे अजिबात मिळत नाही बरं का... उलट झालाच तर थोडासा त्रास होण्याची शक्यता अधिक. विचार बिचार करायला लागण्याची शक्यता अधिक. सवय नसते म्हणून सांगून ठेवतोय...

या सिनेमातला मला सगळ्यात आवडलेला संवाद गीतांजली कुलकर्णीचा... माझं झालं. सगळ्या सिनेमाचं सार या दोन शब्दात दडलेलं आहे... माझं झालं! तेवढच खरं. माझं झालं की झालं.
हा सिनेमा फार साधा आहे. कशाचंही ग्लोरिफिकेशन नाही. हिरो नाही. हिरोईन नाही. व्हिलन पण नाही. कॉमिक रिलीफ सुद्धा नाही. म्हटलं तर आख्खी कॉमेडी. म्हटलं तर आख्खी ट्राजीडी. हा साधेपणा सुद्धा इतका त्रासदायक वाटू शकतो? खरं तर आपलीच गोष्ट पाहताना आपणच त्यावर काय भाष्य वगैरे करणार? फार तर थोडा वेळ ही आपली गोष्ट तर नाहीये ना याची खातरजमा करण्यात जाऊ शकतो...    

अभिराम भडकमकरचं एक हिंदी नाटक आहे. अपलक निद्राहीन. त्या नाटकाच्या शेवटी एक पात्र प्रेक्षकांशी बोलतं. या नाटकातल्या सगळ्या पात्रांचं पुढे नक्की काय झालं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं म्हणतं. आणि मग म्हणतं, मतलब की आप एक पूर्णविराम चाहते है! लेकीन पूर्णविराम तो किताबों में होते है! और यह तो किताब नही थी!... कोर्टला हे तंतोतंत लागू पडतं.

अतिशय कमी प्रेक्षक असलेल्या प्रेक्षागृहात चित्रपट संपल्यावर अनेक आश्चर्योद्गार उमटले. संपला?, असा कसा संपला?, हे काय?, या असल्या सिनेमाला कसला राष्ट्रीय पुरस्कार?... इथपासून यथेच्छ टर उडवणारी तरुण मंडळी होती काल. आणि आपणच जज्ज असल्याच्या थाटात निकाल देऊन मोकळी होत होती. प्रेक्षक मायबाप ना... जज्जच ते... बाहेर पडून त्यांनी कुणाच्या मुस्कटात मारली असेल कोण जाणे. आता त्यांना कसं सांगायचं की अरे असं आपल्याला वाटतंय ना म्हणूनच तर हा सिनेमा! माझं झालंच्या पलीकडे बघायला उद्युक्त करणारा... शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणायचं, कठिण आहे म्हणायचं आणि आपण संत्र खायचं... फारच त्रास झाला तर मधल्या बोटात गोमेद घालून बघायचा... 

ताजा कलम:
एक मात्र नक्की. मारुती कांबळेपेक्षा नारायण कांबळे कमनशिबी ठरला. मारुती कांबळेच्या नशिबी मृत्यू फार स्पष्टपणे लिहिला होता. नारायण कांबळे कुठे असेल कुणास ठाऊक. आणि नारायण कांबळेचं नक्की काय झालं? असा प्रश्न विचारणारा तरी कुणी आहे की नाही कुणास ठाऊक... थोबाडीत मारणारे बेमुर्वतखोर दोन्ही काळात असले तरी... पन्नास वर्षांपूर्वी आणि आज सुद्धा. 

Court


No comments:

Post a Comment