माझा छंद माझा शिक्षक... माझे महाविद्यालय


(हा लेख मी अनेक वर्षांपूर्वी लिहिला होताउद्या २६ एप्रिल २०१५ रोजी बी. एम. सी. सी. च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे. त्यानिमित्ताने हा लेख येथे देत आहे.)

मी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी. पण लोक जेंव्हा मला माझी पदवी कुठल्या विषयात आहे असं विचारतात तेंव्हा कॉमर्स असं सांगताना माझी जीभ जरा अडखळतेच. मी कॉमर्सचा विद्यार्थी खरा पण मी त्यात पदवी घेतली असं मी आजही खात्रीनं सांगू शकत नाही... तशी पदवी मिळाली असली तरी!

मात्र याच महाविद्यालायात माझी माणूस म्हणून जडणघडण होत गेली. हे माणूस म्हणून घडणं मला बी. कॉम. होण्यापेक्षाही जास्त महत्वाचं वाटतं. मी शाळेत असल्यापासून डॉ. श्रीधर राजगुरू (अण्णा) यांच्या शिशुरंजन या संस्थेत नियमितपणे जात असे. सुट्टीमध्ये बालनाट्य करीत असे. अभिनय करणे, कपडेपट सांभाळणे, नेपथ्याची जबाबदारी घेणे, प्रकाश योजना करणे असे अनेक उद्योग मी तेंव्हा करीत असे. अण्णाही माझ्यावर सहजपणे आणि विश्वासाने जबाबदारी टाकत असत. त्या कालावधीतच नाटकाविषयीचं प्रेम माझ्या मनात निर्माण होत होतं. आपल्याला कायम नाटक करता आलं तर किती मजा येईल असं वाटायला तेंव्हाच सुरवात झाली असावी बहुधा.

माझी आई आणि वडील हे दोघेही मानसशास्त्रज्ञ. ते माझे सगळे उपद्व्याप पाहत होते. मला ते दोघेही कायमच सांगत असत की तुला काय करायचं आहे ते तूच ठरवायचं आहेस. तुझ्या निर्णयाची जबाबदारी तुझी असायला हवी. आणि तुझ्या यशापयशाचं श्रेय देखिल तुझंच. त्यासाठी तुला काही मदत लागली तरत आम्ही दोघेही आहोतच. ही गोष्ट माझ्या मनावर पक्की ठसलेली होती. आपण आपल्या आवडीचं काम करायला हवं यावर माझा ठाम विश्वास होता. याच सुमारास मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. दहावी नंतर पुढे काय हा प्रश्न तेंव्हाही सगळ्या मुलांना कमीअधिक प्रमाणात भेडसावत असे. माझ्या मनात एव्हाना पक्कं झालं होतं की दहावीनंतर कुठेही गेलो तरी नाटकच करायचं. शिशुरंजन मधले माझ्याहून मोठे असलेले सगळे दादा आणि ताया बी. एम. सी. सी. मधे होती. माझा समाज झाला की तिथे भरपूर नाटक करायला मिळतं. मी डोळे मिटून बी. एम. सी. सी. मधे प्रवेश घेतला.

अकरावीच्या वर्षातच माझ्या लक्षात आलं की कॉलेजमध्ये अभ्यासही करावा लागतो. आणि मग मला कॉलेजचा विलक्षण कंटाळा येऊ लागला. वर्गातली काही मुलं गोळा करून नाटक करायचा प्रयत्न करू लागलो. पण मजा येईना. कॉलेजमध्ये मी ज्युनिअर. त्यामुळे कॉलेजच्या नाटकाच्या टीममध्ये मला काही महत्वाचं काम किंवा जबाबदारी मिळेना. काय करावं ते कळेनासं झालं. ते वर्ष कसंतरी पार पडलं. शिक्षकांच्या दयाबुद्धीमुळेच वरच्या वर्गात गेलो! पुढचं वर्ष बारावीचं. बरोबरीची मुलं अभ्यासाला लागलेली. तरी मी चुकार मुलं शोधू लागलो. पुरुषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यामुळे कॉलेजच्या नाट्यमंडळात ओढला गेलो. आता मला मजा यायला लागली. नाट्यमंडळात असण्याचे फायदे उपभोगू लागलो. अर्थात हे फायदे पी.टी. च्या तासाला दांड्या मारण्यापासून सुरु होत आणि एखादा प्रयोग संपल्यावर चहा आणि बनवडा खाण्यापाशी संपत. पण त्यात मजा होती.

ज्युनिअर कॉलेजमधून सिनिअर कॉलेजमधे गेलो आणि नाट्यमंडळाची अधिकाधिक जबाबदारी माझ्यावर येत गेली. कॉलेजमधली मित्रमंडळी आणि सहृदय प्राध्यापक वर्ग यांच्या मदतीनं विविध उपक्रम-उद्योग करायला सुरुवात केली. महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये रस घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरुषोत्तम करंडक हे एक महत्वाचं व्यासपीठ आहे. पुरुषोत्तम करंडक मिळवणे हे जीवनाचे एकमेव आणि अंतिम ध्येय असल्यासारखे सर्वजण काम करीत असतात. बी. एम. सी. सी. मधल्या आमच्या पुरुषोत्तमच्या तालमींमध्ये मी असंख्य गोष्टी शिकलो. व्यवस्थापनाचे मूलभूत धडे या तालमींमध्येच गिरवले. श्रमविभागणीचा अर्थ मला या तालमींमध्येच समजला. जबाबदारीबरोबरच अधिकारही बहाल करण्याचा उपयोग या तालमींमध्येच जाणवला. हेनरी फेयोलानं घालून दिलेले धडे मी अजाणतेपणी आमच्या पित्ती हॉलमध्ये गिरवत होतो. थिअरी कळत होती की नाही कुणास ठाऊक पण प्रात्यक्षिकांची कमतरता नव्हती. संवादाची मूलभूत कौशल्यं मी इथेच शिकलो. नटांकडून हवे तसे काम करून घेण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करू लागलो. कुणाला समजावून सांगून काम करून घ्यावे, कुणाला समजावून सांगण्यात अर्थ नाही आणि मी सांगतो तसेच कर असे सांगावे, कुणाला भरपूर झाडल्याशिवाय कळत नाही आणि कुणाला डिवचल्याशिवाय चेव येऊन चागले काम होत नाही यातला फरक कळायला लागला. मी काय आणि कशा पद्धतीने सांगितले तर मला अपेक्षित असलेला परिणाम नटाच्या बोलण्याचालण्यातून साध्य होईल हे लक्षात यायला सुरुवात झाली. वेळाचे व्यवस्थापन म्हणजे काय हे मला इथेच जाणवायला लागलं. पुरुषोत्तमचे नियम फार कडक असतात. साठ मिनिटांच्या कालावधीत एकांकिकेचे नेपथ्य लावून, प्रकाश योजना करून, प्रत्यक्ष एकांकिका सादर करून पुन्हा रंगमंच मोकळा करावा लागत असे. या साठ मिनिटातल्या प्रत्येक मिनिटाचा हिशेब तालमीच्या काळातच केला जात असे. त्यामुळे रंगमंच ताब्यात मिळाल्यावर प्रथम कोण कुठून रंगमंचावर पाय ठेवील आणि काय करेल इथपासून ते प्रयोग संपल्यावर शेवटची लेव्हल कोण उचलून आत नेईल इथपर्यंत प्रत्येक गोष्ट ठरवली जात असे. त्याचबरोबर प्रयोगाच्या संपूर्ण दिवसाचीही आखणी केली जात असे. त्यावेळी मायक्रो आणि मॅक्रो मधला फरक फारसा कळला नव्हता पण त्याचं प्रात्यक्षिक मात्र सतत चालू होतं.

या सगळ्या कालखंडात अनेक जिवाभावाचे मित्र मैत्रिणी मिळाल्यामी ज्युनिअर असताना मला सांभाळून घेणारे सुहास कुलकर्णी, उज्ज्वल केसकर, अतुल टेंबे, सुबोध राजगुरू, राहुल रानडे, बाळकृष्ण दामले, प्रवीण गोखले आणि नंतर माझ्या बरोबरीचे किती तरी जण... सचिन नाईक, रामदास मारणे, मंदार रत्नपारखी, योगेंद्र कावतकर, देवेंद्र ढोबळे, अनुपमा भिडे, राजश्री महाशब्दे, मनीष वाघ, महेश सप्तर्षी, योगेश पावशे, गिरीश देशपांडे, परेश कुलकर्णी, जयदीप बागलकोटे... आणि ज्ञानेश मोरे, मनीष खाडिलकर, रेश्मा जोशी, अश्विनी काटकर, शांभवी साठे, मोहन माडगुळकर असे अनेक ज्युनिअर्ससुद्धा... ही यादी फारच मोठी आहे. (माझ्या पक्षी नावाच्या एकांकिकेत जवळ जवळ एक्केचाळीस कलाकार रंगमंचावर होते...!) सगळ्यांची नावं इथे लिहिणं केवळ अशक्य आहे. आमचा संपूर्ण ग्रुप सुमारे एकशेपाच जणांचा होता! हे सगळे जण कायमच माझ्यावर विश्वास टाकून आणि मला प्रोत्साहन देत माझ्या आजूबाजूला उभे राहिले. प्रसंगी माझ्याशी वाद घातले. पण मी जे काही करून पाहू इच्छित होतो त्याच्यामध्ये नेहमीच सहभागी झाले.

मी महाविद्यालयीन जीवनात केलेला प्रत्येक नाट्यप्रयोग यशस्वी झाला का याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. एस. वाय. बी. कॉम. च्या पुरुषोत्तम करंडकानंतर एम. बी. . च्या प्रथम वर्षाच्या अखेरीपर्यंत मी केलेला जवळ जवळ प्रत्येक प्रयोग कधी परीक्षकांनी नाकारला तर कधी प्रेक्षकांनी. तरीही नाटक करणं काही थांबलं नाही. असं का बरं झालं असावं याचा आज विचार करता काही गोष्टी जाणवतात. त्यावेळी स्पर्धेतलं नाटक करत असताना तिथलं पारितोषिक हे ध्येय असायचं. मोटिव्हेशन असायचं. जणु काही नाटकाचं फलित म्हणजे पारितोषिक. पण त्याचबरोबर नाट्य निर्मितीच्या प्रक्रियेचाही आनंद वाटत असे. ही प्रक्रिया जशी बाहेर घडते तशीच ती आपल्या आतमध्ये पण घडत असते. या काळात मी स्वतःला तपासायला शिकलो. आपल्याला पारितोषिक मिळालं नाही याचं दुःख नेमकं कशामुळे होतं याचा मी विचार करू लागलो. मी जे काही करेन त्याचे लोकांनी कौतुकच केले पाहिजे असा अट्टाहास तर माझ्या मनात नाही ना याचा विचार करू लागलो. आपल्याला जसा आपल्याला जे वाटते ते करून पाहण्याचा अधिकार आहे तसाच इतरांना ते आवडण्याचाही अधिकार आहे हे मी मान्य करायला शिकलो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे सुभाषित आपण शालेय जीवनापासून घोकत असतो. पण या सुभाषिताला एक प्रश्न नेहमी विचारायला हवा. तो म्हणजे केंव्हा? अपयश ही यशाची पहिली पायरी केंव्हा असते? तर जेंव्हा आपण आपल्या अपयशातून काही शिकतो तेंव्हा. आपण आपल्या अपयशातून काही शिकलो तरच ती यशाची पहिली पायरी होण्याची शक्यता असते! हमी नव्हे. अन्यथा परीक्षकांनी पारशिलीटी केली, लाईटवाल्यानं मुद्दाम घोळ केला अशा कारणांच्या कुबड्या आपण शोधू लागतो. आणि या सगळ्याचा शेवट आयुष्यामधल्या कुठल्याही अपयशाची जबाबदारी परिस्थितीवर टाकण्यात होऊ लागतो. अपयशातून शिकताना आपण स्वतःमध्ये काय बदल करू शकतो याचा विचार करायला मी शिकलो. हे जग वाईट आहे आणि ते माझ्याविरुद्धच आहे असा आततायी विचार क्षणभर मान्य जरी केला तरी पुढचा विचार मी काय करतो? मी तर काही जग बदलू शकत नाही. पण मी मला बदलू शकतो. आणि मी माझ्यात काय बदल केला तर माझे जगाविषयीचे आणि कदाचित जगाचे माझ्याविषयीचे मत बदलू शकेल? अशा विचाराचा उपयोग होऊ शकतो असं माझ्या लक्षात आलं. अर्थात हे लक्षात येणं काही आपोआप झालं नाही. माझ्या आई वडिलांच्या मानसशास्त्रज्ञ असण्याचा मला झालेला हा एक फार मोठा फायदा होता!

एका स्पर्धेच्या निकालानंतर मला एका परीक्षकांनी सांगितलं की खरं तर तुलाच अभिनयाचं पाहिलं पारितोषिक होतं. पण ते दुसरे परीक्षक आडवे आले. त्यांना तुझ्याविषयी फारच राग आहे. त्यांनी आग्रहच धरला की याला बक्षीस नको. यावर माझ्या मनातली पहिली प्रतिक्रिया त्या दुसऱ्या परीक्षकाबद्दल तीव्र संतापाची होती. पण काही काळानंतर विचार करता मला अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. माझ्याविषयी राग आहे म्हणून मला पारितोषिक नको असा विचार करणारा हा परीक्षक. याने मला पारितोषिक दिल्यामुळे मला असा कोणता जगावेगळा आनंद मिळणार आहे? किंवा माझ्यावर प्रेम असल्यामुळे जर मला पारितोषिक मिळणार असेल तर त्यात तरी आनंद असणार आहे का? ज्या परीक्षकाने माझ्यावरील प्रेमामुळे मला ही अंदर की बात सांगितली त्याने तरी ते योग्य केले का? परीक्षक असण्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचे त्याने पालन केले का? आणि तसे नसेल तर माझ्यावरील प्रेमापोटी त्याने बक्षीस दिले तरी त्याने मला आनंद होईल का? 

हे आणि असे अनेक प्रश्न विचारण्याचं माझं शिक्षण बी. एम. सी. सी. मधेच झालं. माझ्या मनात उठणाऱ्या अशा प्रश्नांच्या मोहोळानं मी अधिकाधिक घडत गेलो. 

बी. कॉम. पूर्ण झाल्यावर मी सिम्बायोसिस मध्ये एम. बी. . साठी प्रवेश घेतला. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान मी अनेक मुलाखतींना सामोरा गेलो. या काळात मला बी. एम. सी. सी. मध्ये केलेल्या नाटकांच्या अनुभवाचा खूपच फायदा झाला. मी मुलाखतीचा विचार एक प्रयोग म्हणून करू लागलो. कपड्यांचा विचार वेशभूषा म्हणून करू लागलो. सर्व सूट-बूट-टायवाल्यांमध्ये मी सुरवार झब्बा आणि कोल्हापुरी चपला असा माझा नित्याचा पोशाख घालू लागलो. मुलाखतीमध्ये विचारलेल्या पहिल्या प्रश्नाला कोणते आणि कसे उत्तर दिले की पुढचा प्रश्न मला हवा तोच येईल याचा विचार करू लागलो. मुलाखतीच्या खोलीमधली एन्ट्री आणि एक्झिट यांची आखणी करू लागलो. त्यामुळे प्रत्येक मुलाखतीनंतर मला एक चोख प्रयोग केल्याचा आनंद मिळू लागला! बी. एम. सी. सी. मध्ये केलेल्या अभ्यासेतर गोष्टींच्या माध्यमातून झालेले शिक्षण आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार याची खात्री वाटू लागली. पुढे एम. बी. . अर्ध्यावर सोडून मी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात गेलो आणि पूर्ण वेळ नाटक करायचं ठरवलं त्याच्या पाठीशीसुद्धा महाविद्यालयीन अनुभवातून मिळालेला आत्मविश्वास होता.

बी. कॉम. च्या शेवटच्या वर्षातली एक घटना माझ्या पक्की लक्षात राहिली आहे. त्या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ. आमच्या बॅचचं ते शेवटचं वर्षं. त्यावेळी सचिन नाईक, रामदास मारणे आणि मी अश्या तिघांनी ठरवलं की हा कार्यक्रम दणक्यात करायचा! पण म्हणजे नक्की काय करायचं? कार्यक्रम, प्रमुख पाहुणे हे प्रथेप्रमाणे उत्तमच असणार याची खात्री होतीच! मग कल्पना सुचली की त्या दिवशी सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करूया. पण त्याचा खर्च? अशा जेवणावळीसाठी कॉलेजकडून परवानगी अथवा खर्च मिळणं अशक्यच होतं. कार्यक्रमाच्या बजेट मध्ये त्याचा नुसता उल्लेख जरी केला असता तरी आकाश पाताळ एक व्हायची वेळ आली असती! कार्यक्रमाला साधारण पाचशे माणसे येणार असा मागच्या काही वर्षांतला अनुभव. मग एव्हढे पैसे आणायचे कुठून? त्याच सुमारास कॉलेजच्या नोटीस बोर्डावर एक पत्रक झळकलं. कॉलेजच्या अर्थमंथन या वार्षिक अंकासाठी जाहिराती गोळा केल्या तर वीस टक्के कमिशन आणि विशिष्ट रकमेच्या जाहिराती आणल्या तर एक हजार रुपये बक्षीस! झालं. आम्हाला मार्ग सापडला. मी, सचिन नाईक आणि रामदास मारणे कामाला लागलो. अजून एक मित्र मदतीला आला. आम्हाला चौघांनाही बक्षिसाच्या रकमेसह प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाले. केटरिंगचा व्यवसाय करणार अजून एक मित्र धनंजय बारटक्के धावून आला. त्याने अतिशय कमी दरात जेवण देण्याचं मान्य केलं. हा सगळा उद्योग गुपचूप चालू होता.

  कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून पित्ती हॉल मधे स्वैपाकाला आणि भाज्या चिरायला सुरुवात झाली. प्राचार्यांना हे समजताच त्यांना धक्काच बसला. ते भडकले. तेही स्वाभाविकच होतं. त्यांना अंधारात ठेवून, त्यांची परवानगी घेता आम्ही हा घाट घातला होता. एरवी ते नेहमीच आमच्या सगळ्या उद्योगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात असत. पण या उपद्व्यापासाठी त्यांना विश्वासात घेणं जरा अवघडच होतं! दिवसभर मी विविध प्राध्यापक मंडळींना पटवत होतो. अभ्यंकर सर, दाते मॅडम अशा काही सहृदय प्राध्यापकांमुळे कार्यक्रमाला कशीबशी परवानगी मिळाली.

संध्याकाळी मुख्य कार्यक्रमानंतर भोजन हे सर्वांसाठी एक मोठंच सरप्राईज होतं. कॉलेजच्या आवारात रेंगाळत जेवताना सगळ्यांनाच मजा येत होती. कॉलेजमधला शेवटचा कार्यक्रम सगळ्यांच्याच मनात रम्य आठवणी जागवणारा ठरत होता.

भोजनाचा कार्यक्रम सुरु असताना आमचे एक प्राध्यापक आदरणीय . वाय. जोशी सर आमच्या दिशेनं आले. आमचं कौतुक करून झाल्यावर म्हणाले, वनारसे, प्राचार्य तुम्हाला हा कार्यक्रम करू नका म्हणत होते त्याची काही कारणं आहेत. तुम्हाला कदाचित अशा कार्यक्रमावर खर्च करण्यासाठी घरून पैसे मिळतील. पण पुढच्या वर्षीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची आर्थिक परिस्थिती अशी असेलच असं नाही. आणि असे व्यक्तिगत पैसे खर्च करून महाविद्यालयाचा कार्यक्रम करणं बरं दिसत नाही. अरे बाप रे! हा तर समजुतीचा केवढा मोठा घोटाळा! मग आम्ही पैसे कसे गोळा केले ते त्यांना सविस्तर सांगितलं. आमच्या कुणाच्याही घरून एक पैसाही आलेला नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. श्री. . वाय. जोशी सरांनी अर्थमंथनचे संपादक श्री. व्ही. . जोशी सरांना तिथेच विचारलं. त्यांनीसुद्धा आम्ही किती कष्ट करून जाहिराती आणल्या आहेत त्याचं तोंड भरून कौतुक केलं. हे सगळं ऐकल्यावर श्री. . वाय. जोशी सर माझ्याकडे वळले आणि म्हणाले, वनारसे, मला एक सांगा. तुम्ही जेवण करायचं असं आधी ठरवलंत आणि मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे असा विचार केलात की कमिशनचे पैसे आल्यावर आता याचं काय करावं असा विचार करता करता जेवण द्यायचं असं ठरवलं? मी म्हणालो, नाही सर. आधी जेवण द्यायचं असं ठरवलं. आणि मग पैसे कसे मिळवता येतील याचा विचार केला. त्यावर सर हसून म्हणाले, वनारसे, तुम्ही कधी माझ्या इकॉनॉमिक्सच्या वर्गात बसला नाहीत, पण बेसिक इकॉनॉमिक्स तुम्हाला चांगलं कळल आहे!मी, सचिन आणि रामदास, तिघेही मनोमन सुखावलो होतो.   

माझ्या पदवीपेक्षा सरांचं हे वाक्य माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे.

(पूर्व प्रसिद्धी: प्रबोधन पत्रिका) 

ताजा कलम:
गेल्या वर्षीचा माजी विद्यार्थी मेळावा आमच्या बॅचनं आयोजित केला होता. त्यानिमित्तानं खूपच जुने मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा संपर्कात आले. आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा सगळे एकमेकांशी संपर्क ठेवून आहेत. रेखा पवार-शिंदे हिच्या पुढाकारामुळे आणि नंतर पुन्हा एकदा सचिन नाईक, रामदास मारणे, श्रीकृष्ण बराटे, योगेश पावशे आणि गिरीश देशपांडे यांच्या अथक परिश्रमांमुळे सगळे जण संपर्कात राहिले आहेत. फेसबुक, व्हॉटस्अप या माध्यमांमुळे ते अधिक सोपेही झाले आहे!   


बी. एम. सी.सी. मधले सगळे उद्योग आणि उपद्व्याप आणि त्यातून झालेलं शिक्षण हा काही फक्त एका लेखाचा विषय नाही. कदाचित अशी एक स्वतंत्र लेखमालाच होऊ शकेल! आणि तसंही, झालेल्या सगळ्याच गोष्टी लिहिणं सुद्धा अवघडच!!! पण ते सगळं पुन्हा केंव्हा तरी...!


No comments:

Post a Comment