नाटक: कला – व्यवसाय मार्गदर्शन प्रकल्प


“मग? पुढे काय करायचं ठरवलंय?” हा प्रश्न दहावीचा निकाल लागल्यापासून जो आपल्या पाठीमागे लागतो तो सहजासहजी आपली पाठ सोडत नाही. दहावीचा निकाल, मनासारखे गुण मिळाले असतील तर मनासारखे महाविद्यालय, नाहीतर मिळेल तिथे प्रवेश, मग बारावीचा निकाल, कॉमर्स किंवा आर्ट्स असेल तर मुकाट्यानं पुढे जायचं की ‘लॉ’च्या अभ्यासक्रमाला जायचं, सायन्स असेल तर पुन्हा मेडिकल की इंजिनीअरिंग, असं करत करत एकदाचं ग्रॅज्युएशन झालं की पुन्हा एकदा “मग? पुढे काय करायचं ठरवलंय?” हा प्रश्न दत्त म्हणून हजर असतोच. आणि या दरम्यान नाटक, चित्रपट, नृत्य, संगीत अश्या कुठल्याही क्षेत्रात जायचं ठरवलं तर या प्रश्नासोबतच (काही सन्माननीय अपवाद वगळता) आंबट चेहरे, कसं होणार याचं किंवा हिचं असे भाव आजूबाजूला दिसू लागतात. या क्षेत्रात काही वर्ष काम केल्यानंतरही हे प्रश्न पाठ सोडत नाहीत.

गेल्या दोन वर्षांत एस. एस. सी. बोर्डाच्या निकालासोबतच विद्यार्थ्यांच्या कल चाचणीचा निकालही मुलांच्या हातात जातो आहे. गेल्या दोन्ही वर्षांत अधिकांश मुलांचा कल हा कला विषयांमध्ये दिसून आला आहे. पण यांपैकी किती मुलांना कला शाखेत जायची घरून परवानगी मिळते हा संशोधनाचा विषय आहे.

बहुतेक वेळा “मग? पुढे काय करायचं ठरवलंय?” या प्रश्नाचं उत्तर मुलांना नीटसं माहित नसतं. आणि जे माहित नाही ते माहित आहे असं भासवून खोटं खोटं जगायची सगळ्यांची तयारी नसते. बहुतेक वेळा पालकांनाही ते माहित नसतं. बहुसंख्य पालकांना त्यांचा दहावीचा निकाल लागला त्यावेळी याच प्रश्नाला सामोरं जावं लागलेलं असतं. तेंव्हा त्यांच्यापैकीही अनेकांजवळ त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं हे त्यांनाही माहित असतं. पण तरीसुद्धा आपल्या मुलाकडे या प्रश्नाचं ठाम उत्तर नाही याचं विनाकारण दुःख आणि मनस्ताप त्यांना होत असतो.

या सगळ्या गदारोळातून पुढे जाऊन जी धाडसी (किंवा वेडी म्हणा हवं तर) मंडळी नाट्यक्षेत्रात काही करायचं ठरवतात तेंव्हा त्यांच्यासमोर खूपच मोठी आव्हानं उभी ठाकलेली असतात. नाट्यक्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतरही यशस्वी कुणाला म्हणायचं याचे आपले काही सामाजिक ठोकताळे ठरलेले असतात. तुम्ही प्रसिध्द झालात तर यशस्वी, तुम्ही दूरदर्शनवर दिसलात तर यशस्वी, तुम्ही अमिताभ बच्चन झालात तर यशस्वी, तुम्ही प्रशांत दामले झालात तर यशस्वी... इत्यादी, इत्यादी. ही सर्व मंडळी वेगवेगळ्या संदर्भात यशस्वी आहेतच. पण अशी माणसं दर वर्षी निर्माण होत नाहीत. त्यासाठी काही दशकं जावी लागतात. मजेची गोष्ट अशी आहे की एम. बी. ए. झालेल्या आणि एखाद्या कंपनीतून जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झालेल्याला आपण यशस्वीच म्हणतो. त्याला कधी कुणी विचारीत नाही की “ते सगळं ठीक आहे, पण तू धीरूभाई अंबानींच्या एव्हढा कुठे झालास?” पण नाट्यक्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात गेलेला प्रत्येक जण जोपर्यंत अमिताभ बच्चन किंवा नसीरुद्दीन शाह होत नाही तोपर्यंत दुर्दैवानं आपण त्याला अयशस्वीच समजत असतो. 

गेल्या दोन दशकांमध्ये आपल्या देशात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पातळ्यांवर असंख्य बदल होत गेले आहेत. कलेच्या क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्या अनेक मंडळींनी विविध प्रयोग आणि प्रयत्न या वीस वर्षांत करून बघितले आहेत. मात्र नाटकात काहीतरी करायचं आहे हा विचार अभिनय किंवा दिग्दर्शन याच्या फारसा पलीकडे गेलेला नाही. काही तरुण मंडळी वगळता बहुतेक जण ‘मुंबईत जाऊन स्ट्रगल’ या संकल्पनेपाशी जाऊन पोहोचतात आणि थबकतात. नाटक आणि रंगभूमीशी संबंधित इतर कोणकोणती क्षेत्र आहेत? आपण मराठी रंगभूमीच्या पलीकडे जाऊन काही विचार करू शकू का? या क्षेत्रातही भारताबाहेर कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत? अश्या अनेक प्रश्नांकडे बघायचं आपण विसरून जातो.

मला या क्षेत्रात काम करायचं आहे, पण सुरवात कशी करू कळत नाही...
मला तुमच्या बरोबर काम करायची फार इच्छा आहे...
मी एव्हढी वर्ष कष्ट करतोय, पण कुणाचंच माझ्याकडे लक्ष नाही. माझ्याकडे कधी लक्ष देणार आहे का कुणी?”
मला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड आहे. त्यामुळे याच क्षेत्रात काहीतरी करायचं आहे...

ही आणि अशी अनेक वाक्यं नित्यनेमानं आजूबाजूला ऐकू येत असतात. “इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च” (आयपार) च्या ऑफिसवर अशी अनेक तरुण मुलं मुली येत असतात. कमालीची उर्जा असलेली ही मंडळी मनापासून धडपडत असतात. या मुलांच्या डोळ्यातली चमक आणि आवाजातला आत्मविश्वास वेगळाच असतो. उर्जा देत असतो. आयपारच्या संपर्कात आलेली अशी अनेक मुलं-मुली आज जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आली आहेत, अजूनही जात आहेत. या सगळ्या गोष्टी अनौपचारिक संवादातून घडल्या आहेत. पण याचा फायदा फक्त त्यांनाच घेता आला, जे थेट संपर्कात येऊ शकले. पण अशी अनेक मंडळी आहेत ज्यांना अशा संवादाचा खूप उपयोग होऊ शकेल. आणि म्हणूनच यंदाच्या वर्षी आयपारतर्फे एक थिएटर मेंटॉरशिप प्रोग्रॅमसुरु करण्यात आला आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे थिएटर मेंटॉरशिप प्रोग्रॅमहे केवळ एक नाट्यशिबीर नव्हे. नाटक या कलेविषयी शिकतानाच नाटक या क्षेत्राविषयी, या क्षेत्रातल्या संधींविषयी आणि शक्यतांविषयी आपल्या जाणीवा व्यापक करणारा हा उपक्रम आहे. ज्यांना ज्यांना नाट्यक्षेत्रात, नाट्यक्षेत्रासंदर्भात काही करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा एक वेगळा विचार करायला शिकवणारा अनुभव असणार आहे. नाटक आणि इतर प्रयोगकला यात रस असलेल्या नवोदितांना, अनुभवी लोकांच्या हाताखाली ऐका, पहा, करून पहा आणि शिकाअशी संधी देणारा हा उपक्रम आहे. रंगमंचीय शिस्त अंगी बाणवतानाच उपजीविकेचे आणि उद्योजकतेचे पैलू सांभाळणे कसे साध्य करता येऊ शकते हेही कळायला या उपक्रमाद्वारे मदत होईल. कलात्मक अभिव्यक्ती करतानाच कलावंताला एक पोटही असतं आणि ते रोज दुपारी बाराच्या सुमाराला आपलं अस्तित्वं जाणवून देत असतं. ध्येयवेड असणं चांगलंच असतं. पण त्याचबरोबर जगण्याचं भान ठेवणं ही पण अत्यावश्यक गोष्ट असते. आणि या दोन्ही गोष्टी साध्य करणंही शक्य असतं. सोपं नसतं, पण शक्य असतं.  

थिएटर मेंटॉरशिप प्रोग्रॅमजुलै २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत राबविला जाणार आहे. सर्वसाधारणपणे दर महिन्यात चार सत्रे असतील. एकूण किमान छत्तीस सत्रांचे आयोजन या दरम्यान केले आहे. यात नाटकाशी संबंधित कौशल्यविकासाच्या कार्यशाळा असतील, नाट्यवाचनसत्रे, नाट्यप्रयोग बघून, समजावून घेण्याची सत्रे, अनेक विशेषज्ञ व्यक्तींचे मास्टरक्लास असे विविधांगी कार्यक्रम असतील. या प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे.

या प्रकल्पातील रंगकर्मींना आयपारच्या पूर्वनियोजित प्रकल्पातही सहभागी होता येईल आणि नाटकाच्या मूलभूत नियमांचा आणि सध्याच्या भारतीय नाटकातील प्रयोगनिर्मितीच्या विविध प्रकारांचा तसेच जागतिक रंगभूमीवरील विविध प्रवाहांचा अनुभव घेत अभ्यास करता येईल. यामध्ये निवडल्या गेलेल्या रंगकर्मींना आयपार आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवातील काही निवडक कार्यशाळा आणि प्रयोगांनाही विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. या कालावधीत युनेस्कोच्या “इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट”च्या विविध देशांतील विविध प्रकल्पांत सहभागी असलेल्या रंगकर्मींशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. रंगभूमीसंदर्भात असलेल्या विविध शक्यता समजून घेणं, आपली आवड निवड तपासून घेणं, या क्षेत्रात व्यवसाय करायचा म्हणजे काय करायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्यानुसार मार्गदर्शन मिळवणं असं या प्रकल्पाचं स्वरूप आहे.

कलेचं क्षेत्र खूप अवाढव्य आणि अस्ताव्यस्त आहे. त्यात शिस्त नाही. ती फारशी असूही शकणार नाही. आणि या अस्ताव्यस्त विश्वाला एक ठराविक चौकट नाही. त्यामुळे चौकटीत राहिलं तर ठराविक गोष्टी घडणारच अशी खात्री नाही. उदाहरणार्थ एखादा कुणी इन्जिनीअर झाला आणि एखाद्या कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून लागला तर त्याला त्याच्या प्रवासाचा सरधोपट का होईना पण मार्ग माहित असतो. ट्रेनी इन्जिनिअर, सुपरव्हायजर, मॅनेजर, प्लांट मॅनेजर, जनरल मॅनेजर इत्यादींची शिडी ठरलेली असते. कलेच्या क्षेत्रात असं काहीच नसतं. तुमचा मार्ग तुम्हालाच आखायचा असतो. तुमची शिडी तुम्हालाच तयार करायची असते आणि आपली आपणच चढून बघायची असते. प्रत्येक वेळी शिडी चढल्यावर ती मोडणार नाहीच याचीसुद्धा खात्री नसते. किंबहुना कलेच्या क्षेत्रातली शिडी सातत्यानं चढत असताना पडत राहाण्याचीही तयारी ठेवावी लागते.

इतर अनेक क्षेत्रातल्या उपद्व्यापी युवकांचं आपण खूप कौतुक करतो. पण कलेच्या क्षेत्रातल्या मुलामुलींना मात्र पुष्कळच जास्त कष्ट पडतात. ते एका दृष्टीनं चांगलंच आहे. स्वतःला तावून सुलाखून घ्यायला हा वेळ खूप कामी येतो. आयुष्यात पुढे येणाऱ्या अनेक प्रसंगांना तोंड द्यायचं बळ याच काळात मिळत असतं. पण अतिशय विश्वासानं पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं म्हणू इच्छित असलेल्या या मुलामुलींच्या पाठीत दणके मिळण्याची शक्यता अधिक असते.

कला आणि कलाशिक्षण या गोष्टी आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्याच्या कुंपणावरच बसवून ठेवतो. काहीवेळा कुंपणापेक्षा वेशीवर टांगणेच आपल्याला अधिक रास्त वाटते. पण काहीजण मात्र या गोष्टींनीच आपले आयुष्य व्यापून टाकतात. डोळसपणे निर्णय घेऊन कलेचे शिक्षण घेतात. आपल्याला खरच काय करायचे आहे ते हुडकून काढतात. अश्या कलासक्त मंडळींना, त्यांच्या प्रयोगशीलतेला, त्यांच्यातल्या उद्योगीपणाला, त्यांच्यातल्या या कलात्मक उद्यमशीलतेला सकारात्मक, सजग प्रतिसाद देणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. पालकांची, कुटुंबियांची आणि समाजाचीसुद्धा.

हे कसं करायचं? आपल्याला कलाशिक्षण घ्यायचं आहे कि नाही हे कसं काय बुवा ओळखायचं? आणि कलेच्या क्षेत्रात करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं? आणि हे वेळेवर लक्षात यावं यासाठी काय करायला हवं? मी या क्षेत्रातच कार्यरत असेन तर मला अधिक काय काय करता येऊ शकेल? यातले मार्ग कोणते? त्यांपैकी कुठला मार्ग चोखाळावा असं मला वाटतं?

या आणि अशा सर्व प्रश्नाचिन्हांकडे पहात आपापली उत्तरे शोधून काढायला मदत करण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा थिएटर मेंटॉरशिप प्रोग्रॅमआहे.

प्रवेश अर्ज आणि अधिक माहितीसाठी:
वेबसाईट:www.iapar.org/projects
इमेल:iapar.contact@gmail.com
दूरभाष: +91 77750 52719

No comments:

Post a Comment