अण्णा जाऊन दोन वर्ष झाली. बाई जाऊन एक. अशा वेळी काळ किती सहज पुढे जातो वगैरे वाक्य एकदम निरर्थक वाटायला लागतात.
अण्णांना मी
पहिल्यांदा माझ्याच घरी भेटलो. मी आठ - नऊ वर्षांचा असेन. अण्णा काहीतरी कामासाठी
आईकडे आले होते. त्यांच्या गप्पा चालू असतानाच त्यांनी अचानक मला विचारलं, “काय
रे, रेडीओवर गोष्ट सांगायला येशील का?” म्हणजे काय याचा मला पत्ता नव्हता. मी
प्रश्नार्थक चेहरा करून बघत राहिलो बहुधा. मग अण्णाच म्हणाले, “रेडीओ वर बालोद्यान
नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यामध्ये परमवीरचक्र, महावीरचक्र आणि वीरचक्र
मिळवलेल्या तीन शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तुला आवडेल का एक गोष्ट
सांगायला?” माझ्या शाळेच्या बालभारतीमध्ये त्याच वर्षी परमवीर अब्दुल हमीदची गोष्ट
होती. मला ती खूप आवडत असे. मग मी लगेच हो म्हणालो. “रेडिओवर गोष्ट सांगायची
म्हणजे काय करायचं याची मला सुतराम कल्पना नव्हती. “गोष्ट पाठ करायला लागेल?” माझा
प्रश्न. अण्णा हसले. “नाही. आपल्याला वाचायची असते. पण ती वाचल्यासारखी वाटता कामा
नये. संगीतल्यासारखीच वाटली पाहिजे. आपण प्रॅक्टीस पण करू” अण्णा मला समजावून
सांगत म्हणाले. खरं म्हणजे गोष्ट पाठ करायची नाही यानं मला बरंच वाटलं होतं.
माझ्या पहिल्या
रेकॉर्डिंगमध्ये माझ्याबरोबर आनंद जोशी आणि आनंदिनी गोखले असे दोघे जण होते. त्या
दोघांनी पूर्वी रेकॉर्डिंग केलेलं असावं. ते दोघं ‘शिशुरंजन’च्या नाटकांमध्ये पण
काम करतात असं मला तिथेच कळलं. ‘शिशुरंजन’ हे काहीतरी मस्त, मजेदार प्रकरण आहे अशी
माझी खात्री झाली. आपल्याला पण ‘शिशुरंजन’ मध्ये जायला पाहिजे असं वाटायला लागलं.
त्यानंतरच्या
उन्हाळ्याच्या सुट्टीत मी ‘शिशुरंजन’च्या शिबिराला गेलो. अण्णा, बाई, वासुदेव
पाळंदे गुरुजी, श्री. दत्ता श्री. टोळ, सुधाकर प्रभू, प्रा. शरद वाघ, प्रा. शेलार
सर, प्रा. पु. ग. वैद्य सर, भा. रा. भागवत, लीलाताई भागवत अशी एरवी पुस्तकांमधून
भेटणारी अनेक मंडळी प्रत्यक्षात भेटली. या शिबिरांमध्ये मला नाटकाचं बाळकडू
मिळालं. ‘अ’च्या बाराखडीतून वेगवेगळ्या भावभावना व्यक्त करणारे अण्णा माझ्यासाठी
एकदम हिरो झाले! ‘राम नारायण बाजा बजाता’ हे गाणं अण्णांच्या इतक्या तल्लीनतेनं
दुसऱ्या कुणालाही म्हणताना मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. अण्णा काही गायक नव्हते! पण
मुलांना आपलंसं करण्यात त्यांचा हातखंडा होता. पाळंदे गुरुजींची प्रसंग नाट्य, टोळ
काका आणि प्रभू काकांनी सांगितलेल्या गोष्टी, वाघ काकांची ‘आगबोट’ शेलार सरांची
प्रार्थना आणि गाणी, वैद्य सरांच्या गप्पागोष्टी आणि खेळ... किती तरी गोष्टी...
माझ्या लहानपणी माध्यमिक शाळेपेक्षा अण्णांबरोबर शिशुरंजन मधेच मी जास्त रमलो.
त्या वर्षी
आंतरराष्ट्रीय बालक वर्षानिमित्त ‘शिशुरंजन’ने एक कार्यक्रम आखला. त्यामध्ये मीही
सहभागी झालो. शिरीष लिमये, चिंतामणी देशपांडे, सतीश केंजळे, राजू बोधनी, संजय
केळकर, माणिक भंडारे, विदुला कुडेकर, शेखर काळे हे सगळे बी. एम. सी. सी. मधले
दादा-ताई आणि माझ्या बरोबर गीतांजली अत्रे (आता रमा जोशी) असा ग्रुप झाला होता. त्याचे खूप प्रयोग झाले. अण्णांनी पुण्यात आणि पुण्याबाहेर विविध ठिकाणी हे प्रयोग
केले. ‘शिशुरंजन’ मधलं ते वर्षं अतिशय संस्मरणीय ठरलं. मुकुंद कर्वे, महादेव आंबेकर, हेमंत गोडबोले, मिलिंद दाते, मिलिंद केळकर, विकास कुकडे, धनंजय चिंचवडकर असे कितीतरी मित्र इथे मिळाले. खरं म्हणजे अशी अचानक सगळ्यांची नावं पण आठवत नाहीत. पण या सगळ्यांबरोबर केलेली धमाल ही आयुष्यभराचा ठेवा होऊन गेली आहे.
याच सुमारास
थिएटर अॅकॅडमी या संस्थेनं पु. ल. देशपांडे लिखित ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक
करायला घेतलं. माझी आई त्यामध्ये काम करत असल्यामुळे ती मला अनेकदा तालमींना घेऊन
जात असे. तिथे अण्णा होतेच. अण्णा तिथेपण आहेत याची मला फार गम्मत वाटे. कारण
माझ्या दृष्टीनं अण्णा आमचे होते. ‘शिशुरंजन’चे होते. ते थिएटर अॅकॅडमीचे पण अण्णा
होते हे मला तेंव्हा नव्यानं कळलं! या नाटकाच्या तालमी उशिरा चालत असत. सगळेजण
आपापले दिवसभराचे उद्योग संपवून येत असत. अण्णांनी तिथे सगळ्यांसाठी पोळी भाजीची
व्यवस्था केलेली असे. तिथली मटकीची उसळ मला अजूनही आठवते! सगळे जण जेवल्याखेरीज
अण्णा जेवण घेत नाहीत हे मी तिथे पाहिलं होतं. मला वाटतं की अण्णांकडून माझं
शिक्षण त्यासुमारास सुरु झालं असावं.
माझी माध्यमिक
शाळेची वर्षं प्रामुख्यानं ‘शिशुरंजन’मय आणि ‘अण्णा’मय होती. मला शाळेविषयी
अजिबातच आकर्षण नव्हतं. आणि अण्णांनी ‘शिशुरंजन’ची विलक्षण ओढ निर्माण केली होती.
मी आठवी – नववीत जाईपर्यंत अण्णांनी मला ‘प्रतिज्ञा’ सारख्या मोठ्यांच्या
एकांकिकेतही काम करायला घेतलं होतं. आठवी आणि नववी नंतरच्या उन्हाळ्याच्या
सुट्ट्यांमध्ये शिशुरंजनच्या उद्यान मेळाव्यांच्या आयोजनामध्ये अण्णांनी मला
सहभागी करून घेतलं. आयत्या वेळचे प्रयोग, काही हातखंडा प्रयोग, कथाकथन स्पर्धा,
कविता वाचन आणि गायन अश्या अनके उपक्रमांनी हे उद्यान मेळावे सजलेले असत. या
उद्यान मेळाव्यांनी मला कमालीचा आत्मविश्वास आणि उर्जा दिली.
शिशुरंजनची
बालनाट्यही होत असत. ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘राक्षसराज झिंदाबाद’ आणि ‘अचाट
गावाची अफाट मावशी’ या नाटकांचे प्रयोग होत असत. ‘आनंदीगावचा गम्मतराव’ हे अतुल
पेठेनं लिहून बसवलेलं शिशुरंजनचं नाटक हे मी काम केलेलं पाहिलं पूर्ण लांबीचं
बालनाट्य! त्यानंतर श्री. कमलाकर सोनटक्के सरांनी बसवलेलं ‘पाण्या तुझा रंग कसा’,
आईनं बसवलेलं स्वप्न आणि पक्षी अशी वेगवेगळी नाटकं शिशुरंजन मध्ये करता आली. या
सगळ्या कालखंडात अण्णांनी माझ्यातल्या व्यवस्थापकाला खतपाणी घालायला सुरुवात केली
होती. नाटकांचा कपडेपट सांभाळणे, नेपथ्याची जबाबदारी घेणे, गरज पडेल तेंव्हा
प्रकाशयोजनेची जबाबदारी घेणे अश्या अनेक गोष्टी अण्णा माझ्यावर टाकत असत.
अण्णांच घर
आमचंही घर होतं. मोहोर. या मोहोर मध्ये बाईंच्या बरोबर बसून हस्तलिखीतं तयार करणं,
शिबिराच्या शेवटच्या दिवसाच्या प्रदर्शनाची तयारी करणं, बक्रमच्या कापडावर लोकरी
नक्षीकाम करणं असे असंख्य उद्योग केले. रेडिओवरच्या अनेक
कार्यक्रमांच्या तालमी इथेच झाल्या. अण्णांच्या इमारतीवरची गच्ची आमची हक्काची
झाली होती. मोहोरची गच्ची हे नियमित भेटण्याचं ठिकाण झालं होतं. बाई असल्या की
खाण्यापिण्याची सुद्धा मजा असायची. मुलांनी केंव्हा आणि काय खावं याविषयी त्या
अतिशय जागरूक असायच्या. उगाच केंव्हातरी काहीतरी खात बसायचं नाही. पण योग्य वेळी योग्य
ते नक्की खायचं. अण्णांच जरा उलट असायचं. त्यामुळे आम्ही सोयीनुसार अण्णा किंवा
बाईंना भूक लागली म्हणून सांगत असू!
मी कॉलेजमध्ये
गेलो आणि शिशुरंजनचा अवकाश मला पुरेनासा झाला. मी आता ‘मोठा’ झालो होतो! 'टीन एज' मधून 'अॅडल्टहूड'कडे निघालो होतो. बालनाट्य मला शाळकरी वाटू लागली होती. माझ्या कॉलेजमध्ये अण्णांचा मुलगा
सुबोध मला सिनिअर होता. त्याच्यामुळे अण्णांशी संपर्क राहिला होता. कॉलेज, नंतर
एन.एस.डी. मधली वर्ष भराभरा पुढे सरकली. मी पुण्यात आल्यानंतर नाट्य प्रशिक्षण हे
माझं क्षेत्र ठरवून घेतलं होतं. आणि मग पुन्हा अण्णांची प्रकर्षानं आठवण झाली.
लहान मुलांबरोबर काम करताना अण्णा आणि बाई हवेतच असं वाटू लागलं! आणि मग पुन्हा
सुट्टी मधल्या शिबिरांची सुरुवात झाली. लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टी मधली
पुण्याजवळची निवासी शिबिरे हा वार्षिक कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग होऊन गेला.
मधल्या काळात दहा वर्ष निघून गेली होती. पण अण्णा आणि बाईंचा उत्साह तसूभरही कमी
झालेला नव्हता. उलट वाढला आहे कि काय अशी शंका यावी अशी परिस्थिती होती! अण्णांना
मुलं कायम लटकलेली असायची. अण्णांचे काही काही खेळ वरकरणी निरर्थक वाटायचे. पण या
खेळांतून मुलांना खूप गोष्टी शिकायला मिळत असत. दहा पंधरा वर्षांपूर्वी मी ते खेळ
खेळत असे. आता अण्णांच्या बरोबर मी ते खेळ मुलांकडून करवून घेत असे. मला स्वतःला
याचं फार अप्रूप वाटे. अण्णांचं ‘खेळ आमुचे जंमतीचे’ आणि बाईंचं ‘इंग्रजी शिकूया
गंमतीने’ ही दोन पुस्तकं माझी लाडकी पुस्तकं झाली होती.
माझी आणि
अण्णांची शेवटची भेट ‘अथश्री’ मध्ये झाली. माझा मामा तिथेच रहात असे. मराठीतले
ज्येष्ठ नाटककार प्रा. गो. पु. देशपांडेही तिथेच रहात असत. अण्णांना ऐकू येणं जरा
कमी झालं होतं. पण उत्साह ओसरला नव्हता. शाबासकी आणि आशीर्वाद या दोन गोष्टी ते
भरभरून देत असत.
एके दिवशी सकाळी
अण्णा गेले असा निरोप आला. त्यांच्या इच्छेनुसार कुणासाठीही न थांबता उर्वरित
गोष्टी संपल्या. बाईंना भेटायला गेलो. बोलणार तरी काय? बाईंनीच माझी समजूत
घातली...
गेल्या वर्षी
अण्णांना जाऊन एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच बाई पण गेल्या. सुबोधशी फोनवर बोललो.
खरं म्हणजे फक्त ऐकलं...
खूप वर्षांपूर्वी भा. रा. भागवतांनी ‘बालमित्र’ हा बंगला बांधला होता. त्यांनी जेंव्हा तो विकायचा ठरवलं तेंव्हा त्यांना तो एखाद्या बालकांच्या मित्रालाच द्यायचा होता. अण्णा आणि बाईंनी तो काही वर्षांपूर्वी घेतला होता. भा. रा. भागवत गेले. लीलाताई गेल्या. अण्णा गेले. बाई पण गेल्या. जो करेल रंजन मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे म्हणत म्हणत, मुलांचे रंजन करीत, त्यांचे नाते प्रभूशी तर केंव्हाच जुळले होते... आता बहुधा प्रभूलाच करमेनासे झाले...
खूप वर्षांपूर्वी भा. रा. भागवतांनी ‘बालमित्र’ हा बंगला बांधला होता. त्यांनी जेंव्हा तो विकायचा ठरवलं तेंव्हा त्यांना तो एखाद्या बालकांच्या मित्रालाच द्यायचा होता. अण्णा आणि बाईंनी तो काही वर्षांपूर्वी घेतला होता. भा. रा. भागवत गेले. लीलाताई गेल्या. अण्णा गेले. बाई पण गेल्या. जो करेल रंजन मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे म्हणत म्हणत, मुलांचे रंजन करीत, त्यांचे नाते प्रभूशी तर केंव्हाच जुळले होते... आता बहुधा प्रभूलाच करमेनासे झाले...


No comments:
Post a Comment