इतिहास
या शब्दाविषयी लहानपणापासूनच एक वेगळी भावना आपल्या मनात असते. प्राथमिक शाळेत
असताना इतिहासाची पुस्तके छान वाटतात. थोरामोठ्यांची गोष्टीरूप चरित्रे वाचायला
मजा येते. शिवाजी महाराज आपले प्रेरणास्थान असतात. गडकिल्ल्यांची सफर आपल्याला
आवडू लागते. पुढे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत गेल्यावर हळू हळू हा विषय
अधिकाधिक नीरसतेकडे झुकायला लागतो. गोष्टीरूप संपत जाते आणि कंटाळवाणी माहिती आणि
सनावळ्या पाठ करण्यावर भर द्यायला सुरुवात होते. प्लासीच्या लढाईत काय काय घडले
याच्या पेक्षा त्याचे सन लक्षात ठेवण्यावर एक मार्क अवलंबून असतो. व्यापारी म्हणून
आले आणि राज्यकर्ते बनले इथपासून ते डलहौसीने केलेल्या सुधारणांचा पाढा पाठ करता
करता नाकी नऊ येत राहतात. इतिहासाकडे पाहायचा दृष्टीकोन दहावीच्या पेपरपुरता
मर्यादित रहात जातो. शाळेतले शिक्षकही बहुधा गणित आणि शास्त्र या विषयांना जेव्हढे
महत्व देतात तेव्हढे महत्व इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र या विषयांना देत नाहीत. चोख
पाठांतर केले तर हमखास गुण मिळवून देणारे विषय यापलीकडे यांचे महत्व नसते.
अश्या
स्थितीत शिक्षण घेतल्यानंतर इतिहासाकडे बघण्याची दृष्टी वगैरे तयार होण्यासाठी
चुकून माकून एखादा उत्तम शिक्षक भेटला तर ठीक, नाहीतर अजून एक विषय यापलीकडे वेगळा
काही दृष्टीकोन तयार होत नाही.
आणि
आपण जेंव्हा नाटक शिकायला सुरुवात करतो तेंव्हा अनेक वेळा इतिहासाविषयीची आपली ही
धारणा पक्की झालेली असते. इतिहास हा एक निरुपयोगी विषय आहे. आम्ही अभिनेते / अभिनेत्री
/ दिग्दर्शक होऊ इच्छितो आणि त्यासाठी याची खरं म्हणजे फारशी गरज नाही. आपल्या
शिक्षण पद्धतीमध्ये हा विषय शिकवतात म्हणून आपण शिकणार. पण खरे तर याचा काहीच
उपयोग नाही.
आणि
काही वेळा आपण जेंव्हा नाटक शिकवायला सुरुवात करतो तेंव्हाही इतिहासाविषयीची आपली
ही धारणा पक्की झालेली असते. इतिहास हा एक निरुपयोगी विषय आहे. आम्ही अभिनेते /
अभिनेत्री / दिग्दर्शक घडवू इच्छितो आणि त्यासाठी याची खरं म्हणजे फारशी गरज नाही.
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा विषय शिकवतात म्हणून आपण शिकवणार. पण खरे तर याचा
काहीच उपयोग नाही.
हे
असं का होतं? याचं एक महत्वाचं कारण आपल्या इतिहास म्हणजे काय याच्या उत्तरात
दडलेले आहे. आपल्या शालेय अनुभवातून अनेकदा इतिहास म्हणजे केवळ ‘माहिती’ असे
आपल्या कळलेले असते. पूर्वी घडून गेलेल्या गोष्टींची, घटनांची माहिती. थोडे अधिक
पुढे आलो तर इतिहास म्हणजे आपल्या पूर्वसूरींची माहिती, त्यांच्या कामाची,
कार्यकर्तृत्वाची माहिती इथपर्यंत आपण पोहोचतो. खरं पाहिलं तर या पूर्वसुरींचा वेध
आपण अनेकदा जाणता-अजाणता घेत असतो. इतिहासाचा अभ्यास म्हणून नव्हे. हा इतिहास
लिखित आणि मौखिक अशा दोन्ही रूपांत आपल्यापर्यंत येत असतो. काहीवेळा तो
किस्सेबाजीपर्यंतच मर्यादित राहतो.
पण
याच्या बरोबरीने हा इतिहास आपल्याला एक संदर्भ देत असतो. आपल्या कामाला एक संदर्भ
देत असतो. आणि या संदर्भाच्या बरोबरीने एक पर्स्पेक्टीव्ह – परिप्रेक्ष्य – देत
असतो. याच्याकडे बघणे सर्वार्थाने मनोरंजक आणि जीवन शिक्षण देणारे असू शकते ही
गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
रंगभूमीच्या
इतिहासाचा अभ्यास हा केवळ एका विद्याशाखेचा अभ्यास असू शकत नाही. हा
आंतरविद्याशाखीय विषय आहे. आणि म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासाकडे पाहताना हा
आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असणे नितांत गरजेचे आहे. रंगभूमीच्या इतिहासामध्ये
आपल्याला एखादी घडून गेलेली घटना दिसते. त्या घटनेचे समाजमनावर काय परिणाम झाले
याचा विचार करताना समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही विषयांकडे गांभीर्याने
पाहावे लागते. माझे समाजशास्त्रीय मत म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टीकोन नव्हे हे लक्षात
घेतले पाहिजे. इतिहासात घडून गेलेल्या घटनेच्या मागे काही तात्विक बैठक आहे का?
सापडते का? यासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे होऊन बसते. माझा आयुष्यविषयक
दृष्टीकोन म्हणजे तात्विक बैठक नव्हे हे पण लक्षात घेतले पाहिजे. या घडून गेलेल्या
घटनेला काही राजकीय संदर्भ आहेत का? ते समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास
करणे आवश्यक ठरते. याच पद्धतीने मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र असे अनेक विषय
इतिहासाच्या हातात हात गुंफून येत असतात. माझ्या म्हणण्याचा अर्थ हे सगळे विषय विद्यापीठीय पद्धतीने
नाटकाच्या विद्यार्थ्यांनी शिकावेत असा नाही. पण रंगभूमीच्या इतिहासाचा अभ्यास
करताना या इतर विषयांमध्ये रस घेऊन आपला पर्स्पेक्टीव्ह तयार करता येऊ शकतो हे
लक्षात घेतले पाहिजे. आणि हा पर्स्पेक्टीव्ह आपल्या आजच्या कामाला संदर्भ देऊ शकतो
हेही लक्षात घेतले पाहिजे.
आपल्या
सर्वांना माहित असलेले एक उदाहरण घेऊ. एकोणीसाव्या शतकात युरोपमध्ये वास्तववादी
नाटके लिहायला आणि समोर यायला सुरुवात झाली. हे असे का बरे घडले असावे असा विचार
केला की त्याची बीजे आपल्याला औद्योगिक क्रांतीमध्ये दिसू लागतात. मध्यमवर्ग हा एक
नवाच वर्ग औद्योगिक क्रांतीने निर्माण केला. या वर्गाचे प्रतिनिधित्व रंगमंचावर
होणे अपरिहार्य होते. मग नाटकातली पात्रे बदलली. राजे-रजवाडे गेले आणि मध्यमवर्गीय
माणसे मुख्य भूमिकेत दिसू लागली. अशाच प्रकारचा बदल आपल्याकडे स्वातंत्र्याच्या
अलीकडे पलीकडे दिसू लागला. तेंडुलकरांनी ‘श्रीमंत’ लिहिले तेंव्हाच्या सामाजिक
राजकीय स्थितीकडे पहिले तर आपल्याला करावयाचे नाटक अधिक सकस होण्याची शक्यता वाढते
याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही.
भारतीय
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोककलांचा खूप वापर झालेला आपल्याला दिसतो.
महाराष्ट्रामधेही हा प्रभाव आपल्याला दिसून येतो. हा वापर प्रामुख्याने
लोकशिक्षणवादी रंगभूमीने केला. या कामातून आपला प्रेक्षकवर्ग तयार होत गेला. अश्या
प्रकारची अभिव्यक्ती ग्रामीण भागात फारशी नवी नव्हती पण नागर प्रेक्षकही अश्या
प्रकारच्या अभिव्यक्तीकडे पहायला शिकला. केवळ बहुजनांची अभिव्यक्ती यातून लोककला
अभिजनांच्या दिशेनेही सरकल्या. आणि त्यानंतर आपण घाशीराम कोतवाल पहिले. घाशीराम
समजून घेताना अशा प्रकारचे सामजिक संदर्भही अतिशय महत्वाचे ठरतात.
आधुनिक
भारतीय रंगभूमीचा अभ्यास करताना आषाढ का एक दिन, तुघलक़ अशी अनेक नाटके आपल्या समोर
येत असतात. यामध्ये सुद्धा एक मजेदार गोष्ट आहे. ही साधारणपणे एका कालखंडात लिहिली
गेलेली नाटके. त्याच्याच पाठोपाठ मराठीमध्ये रायगडाला जेंव्हा जाग येते हे नाटक
लिहिले गेले. मोहन राकेश, गिरीश कर्नाड आणि वसंत कानेटकर यांच्या या तीनही
नाटकांमध्ये एक समान सूत्र दिसते. या तीनही नाटककारांनी इतिहासातील व्यक्तिमत्वे
घेऊन त्यांचे माणूसपण धुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे. कालिदास, तुघलक़ आणि छत्रपती
शिवाजी महाराज यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याचा प्रयत्न या नाटकांमध्ये झालेला
दिसतो. या तीन नाटककारांनी एकत्र बसून ठरवून लिहिलेली ही नाटके नव्हेत. मग
भारताच्या तीन वेगवेगळ्या भागात रहात असलेल्या या तीन नाटककारांना एकाच कालखंडात
असे का वाटले असावे? अशी उर्मी निर्माण होण्यामागे काय घडले असावे? सामाजिक
पातळीवर? मानसिक पातळीवर? हा रंगभूमीच्या इतिहासाच्याच अभ्यासाचा भाग आहे.
अनेकदा
आपल्याला असंही वाटतं की आपण आपल्याला वाटतं ते करू. इतिहासात काय होऊन गेलं त्या
भानगडीत आपण कशाला पडा? आपली कल्पनाशक्ती आणि आपण! आधी करूया तर खरं... पण आपली
कल्पनाशक्ती म्हणजे तरी नेमके काय? आपली कल्पनाशक्ती ही आपल्या अनुभवावर आणि
ज्ञानावर अवलंबून असते. आपल्याला जे दिसते त्याच्या आधारावर आपण कल्पना करू शकतो.
आपला अनुभव असतो की माणूस चालतो. आपला अनुभवं असतो की पक्षी उडतो. मग आपण कल्पना
करतो की माणूस उडू शकेल का? आपल्याला जे माहित असते आणि आपण जे अनुभवलेले असते
त्याच्या आधारावरच आपण कल्पना करीत असतो.
मी
एन एस डी मध्ये शिकत असताना आलेला एक अनुभव सांगतो. जागतिक रंगभूमीचा अभ्यास
करताना अर्थातच शेक्सपिअर समोर आला. माझा इंग्रजी भाषेचा अभ्यास गरजेपुरताच होता.
आणि मला प्रश्न पडला की शेक्सपिअर हा महान लेखक का बरे होता? असा प्रश्न सहसा
शिक्षकांना आवडत नाही. साहित्याचे शिक्षक असले तर पटकन आपल्या ज्ञानावर ताशेरे
ओढले जाण्याची शक्यता असते. पण माझे प्रश्न खरे होते. त्या काळात त्याची नाटके
जगभर कशी बरे गेली? जगभरातल्या असंख्य भाषांमध्ये ही नाटके कशी भाषांतरित झाली?
आणि या प्रश्नाच्या मागे लागल्यावर इंग्रजी साम्राज्याचा एक वेगळाच अर्थ मला कळू लागला.
इंग्रजी साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नसे! या संपूर्ण साम्राज्यात इंग्रजांनी
शेक्सपिअर नेला. राजकीय जग ताब्यात घेता घेता इंग्रजांनी साहित्य आणि सांस्कृतिक
जगावरही आक्रमण केले. शेक्सपिअर त्यामध्ये फारच महत्वाचा ठरला. पुढे लंडनच्या
शेक्स्पिअर्स ग्लोब या थिएटर मध्ये अभ्यास करताना वेगळाच शेक्सपिअर दिसला. हा
शेक्सपिअर खूप सोपा होता. तो नाटककार होता. साहित्यिक नव्हता. इतिहासाच्या
अभ्यासातून शेक्सपिअर कसा होता याचा अनुभव घेता घेता त्याची भीती नाहीशी झाली आणि
सिम्बेलाईन सारखे अत्यंत सामान्य दर्जाचे नाटकही त्यानेच लिहिले हेही लक्षात आले.
आणि तसे म्हणायची भीतीही वाटेनाशी झाली!
इतिहासाचा
अभ्यास म्हणजे केवळ शंभर मार्कांचा पेपर नव्हे. इतिहासातून आपण शिकतो असं आपण
म्हणतो. इतिहास आपल्याला जगण्याचे धडे देत असतो. त्यांच्याकडे डोळसपणे पहायला
शिकले पाहिजे. नाहीतर ‘इतिहास धडा शिकवत नाही एव्हढाच धडा’ असे व्हायला फारसा वेळ
लागत नाही.
याठिकाणी
मी अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इ. ओ. विल्सन याचे एक विधान उधृत करतो.
“History doesn’t make sense without prehistory and prehistory
doesn’t make sense without evolution. Humanity today is like a waking dreamer,
caught between the fantasies of sleep and the chaos of the real world. The mind
seeks but cannot find the precise place and hour. We have created a Star Wars
civilization, with Stone Age emotions, medieval institutions, and godlike
technology.”
या
अशा जगात जगताना आपले पाय मातीमध्ये घट्टपणे रोवून उभे राहणे अधिकच महत्वाचे होत
जाते. आणि असे आपल्या मातीत रुजण्यासाठी इतिहास हा आपला उत्तम सखा, सोबती आणि
मार्गदर्शक होऊ शकतो. आपली मुळे घट्ट ठेवून उंच भरारी घेणे अवघड असले तरी अशक्य
नाही.
नाटक
काय काय करू शकतं? ते परंपरा जपू शकतं. ते परंपरेच्या चौकटी मोडूही शकतं. यापैकी
काहीही करायचं असेल तर काय जपायचं किंवा काय मोडायचं हे इतिहासातूनच कळू शकतं. इतर
कशातूनही नाही.
(अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ आयोजित ‘रंगवेध’ या परीसंवादामधील भाषण)
No comments:
Post a Comment