Friday, July 11, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (नऊ)

“तरीपण मला एक प्रश्न आहे...” बंडीचे ‘तरी पण’ काही संपत नव्हते.
“बोल.”
“मला असं सांगा की या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना कामंपण तशी एकसुरीच मिळतात. गोड गोड दिसायचं... गोड गोड हसायचं... लाडेलाडे बोलायचं... आणि हिरोच्या मागे मागे फिरायचं... मग याच्यामध्ये करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं...”
“तुला खरंच असं वाटतं?”
“होय. सगळ्याजणी तेच तर करीत असतात.”
“सगळ्या जणी म्हणजे कोण कोण?”
“सगळ्याच. कुठल्याही नटीचं नाव घ्या. ती हेच करते. आणि तिला हेच करावं लागतं.”
“असं? मग आता उदाहरण दे बघू.”
“अं...? कुठलंही नाव घ्या. काजोल, राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय... केवढी तरी उदाहरणं आहेत.”
“मी तुला काही सिनेमांची नावं विचारतो. ते तू पहिले आहेस का ते सांग. तू ‘कुछ कुछ होता है’ पहिला आहेस?”
“अर्थात. हा काय प्रश्न झाला... थिएटरमध्ये जाऊन सात वेळा पाहिलाय!”
“माय नेम इज खान?”
“कुठला?”
“माय नेम इज खान...”
“नाही.”
“हे राम...?”
“का? काय झालं?”
“झालं काही नाही. ‘हे राम’ हे सिनेमाचं नाव आहे. कमलहासनच्या. पहिलायस?”
“नाही.”
“प्रव्होक्ड?”
“नाही...”
“का बरं हे चित्रपट पाहिलेले नाहीत?”
“काय माहित... या सिनेमांची नावं पण ऐकलेली नाहीत.”
“बरं. सई परांजपेंचे किती सिनेमे पहिले आहेस?”
“त्यांचं नाव ऐकलंय अधूनमधून. पण त्यांनी कोणकोणत्या सिनेमात कामं केली आहेत ते नाही माहित.”
“त्या दिग्दर्शिका आहेत.”
“हो का... सॉरी हं... पण मला तसं नीटसं माहित नाहीये...”
“हे मात्र तुझं सगळ्यात खरं वाक्य आहे. ‘मला तसं नीटसं माहित नाहीये...’ पण तरीही सर्व प्रकारचे निष्कर्ष काढून तू मोकळी झाली आहेस नाही का?”
“म्हणजे?”
“म्हणजे गेल्या वेळी तुला असं वाटत होतं की सर्व मुलींना कास्टिंग काऊचवर जाण्याशिवाय पर्याय नाही. आज तुला असं वाटतंय की सगळ्या मुलींना एकसारखंच आणि वरवरचं काम असतं...”
“...पण म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये...”
“पण तसंच म्हणालीस की नाही आत्ता? या आपल्या डोक्यातल्या समजुती केंव्हा डोकं वर काढतील याचा नेम नसतो. हे बघ... जेंव्हा तू अभिनेत्री म्हणून काम करायचं ठरवतेस तेंव्हा सर्व प्रकारची कामं तुझ्या दिशेनं येणार. त्यातल्या कुठल्या कामाला होकार द्यायचा आणि कुठल्या कामाला नकार द्यायचा हे तूच ठरवायचं आहेस नाही का? यावर आपली अशीही एक समजूत असते की आपल्याला निवडीचा अधिकार नसतो. आपण नवीन असतो. आणि त्यामुळे जे मिळेल ते काम करावंच लागतं. पण हे खरं नाही. आपण स्वतःच असं ठरवतो की आपला निवडीचा आणि नाही म्हणण्याचा अधिकार वापरायचा नाही. आत्ता आपल्याला विचारलाय ना, मग आधी हे काम पदरात पाडून घ्या. आणि या शॉर्ट टर्म फायद्यासाठी आपण आपलं संपूर्ण करीअरच पणाला लावतो.”
“आता तुम्ही द्या पाहू असं उदाहरण ज्यानं किंवा जिनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात कामाला नाही म्हटलं...”
“गांधी विरुद्ध गांधी हे नाटक पाहिलंयस? किंवा नाव तरी ऐकलं आहेस का?”
“पाहिलं नाहीये. पण नाव ऐकलंय. अतुल कुलकर्णी होता नं त्यात? त्यानं नटरंगमध्ये काय सॉलिड काम केलंय...”
“हं... पण कदाचित तो आपल्याला नटरंगमध्ये कधीच दिसला नसता. त्यानंच मागे एकदा बोलताना सांगितलं होतं की ‘गांधी विरुद्ध गांधी’ नंतर महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी त्याला असंख्य ऑफर्स येत होत्या. अगदी मेक अप करून स्टेजवर थोडावेळ येऊन जाण्यापासून ते सिनेमापर्यंतच्या. त्या सर्वांना त्यानं नकार दिला. लक्षात घे की ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे त्याचं पाहिलं व्यावसायिक नाटक होतं. तो नुकताच मुंबईत आलेला नवीन नट होता. आणि त्यालाही कामाची गरज होतीच... पण कामाची गरज आणि करिअरची आखणी यामध्ये गल्लत करून चालत नाही. त्या वेळी जर त्यानं त्या सर्व भूमिका स्वीकारल्या असत्या तर त्याला कदाचित भरपूर पैसे मिळाले असते. आणि कदाचित त्याच्यावर गांधींचं काम हातखंडा करणारा नट म्हणून शिक्का बसला असता. आणि तसं झालं असतं तर त्याचे नट म्हणून असलेले बहुरंग आणि बहुढंग - म्हणजे ‘व्हर्सटॅलिटी’ – आपल्याला कदाचित बघायलाच मिळाले नसते. त्यानं जेंव्हा त्या भूमिकांना नकार दिला तेंव्हा काही त्याला माहित नव्हतं की आपण पुढे यशस्वी होणार की अयशस्वी. पण करिअर म्हणून आपल्याला काय करायचं आहे याची पुरेशी स्पष्टता त्याच्या डोक्यात होती. सुरुवातीला बोलताना तू काही अभिनेत्रींची नावं घेतलीस. त्यांनीही काही चित्रपटांमधून त्यांच्या कुवतीची ओळख करून दिली आहे. आणि त्यांनी त्यांच्या करिअरविषयी काही निर्णय घेतले आहेत. त्यावर आपण घाईघाईनं व्हॅल्यू जजमेंट देण्याचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येकाला एकाच विशिष्ट पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात असं समजण्याचं कारण नाही. म्हणूनच मी अतुलचं उदाहरण दिलं.”
“पण तो पुरुष आहे. या क्षेत्रातल्या बायकांना असं करता येतं का...” आता बंडूलाही कंठ फुटला.
“किती नावं सांगू? सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, कविता लाड, ज्योती सुभाष... अलीकडची नावं घ्यायची तर मृणाल कुलकर्णी, रसिका जोशी, विभावरी देशपांडे... यांच्यापैकी कुणीही फक्त हिरोच्या मागे धावलेलं नाही. खोटं खोटं दिसत आणि खोटं खोटं हसत आपलं स्त्रीत्व विकायला काढलेलं नाही. आपण निदान आपल्या स्वतःवर तरी विश्वास ठेवायला हवा. आणि आपलं आयुष्य नेहमी आपल्याच हातात असतं या गोष्टीवरही विश्वास ठेवायला हवा. आपण कसे वागतो यावर आपलं काय होणार हे अवलंबून असतं. प्रभा गणोरकर यांची एक कविता आहे,
‘आयुष्य आपल्याला फरपटत नेतं
हे खोटं आहे
कित्येकदा आपणंच आयुष्याचं बोट धरून त्याला भलत्या वाटेवर सोडून येतो.’
या दोन ओळी जरी लक्षात ठेवल्या तरी कितीतरी गोष्टी सुकर होऊन जातील.”  

(क्रमशः)     
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)


No comments:

Post a Comment