Saturday, June 28, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (आठ)

“ही माझी मैत्रीण...” बंडू.
“नमस्कार.” मी तिच्याकडे बघून म्हणालो. मनातल्या मनात मी तिचं नाव ठरवून टाकलं... बंडी!
“मला पण कलाक्षेत्रातच करिअर करायचं आहे. तुम्ही बंडूशी जे बोलता ते सगळं तो माझ्याशी येऊन बोलतो. पण माझे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत... मी मुलगी आहे ना... त्यामुळे...”
“त्यामुळे काय...”
“आपण काय काय ऐकतो ना या सेलिब्रिटीजचं... म्हणजे मुलींशी नीट वागत नाहीत वगैरे... म्हणजे तुमच्या लक्षात येतंय न मला काय म्हणायचंय ते...”
“माझ्या लक्षात येतंय. आणि त्यामुळेच मी तुला काही प्रश्न विचारणार आहे.”
“तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात? खरं म्हणजे मला प्रश्न आहेत आणि मला वाटत होतं की तुम्ही मला उत्तरं देणार आहात...”
“मी तुला जे प्रश्न विचारणार आहे त्यातूनच कदाचित आपल्याला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. चालेल?” मला या चुणचुणीत बंडीचं कौतुक वाटत होतं.
“चालेल.”
“मग माझा पहिला प्रश्न असा की मुलींशी नीट वागत नाहीत म्हणजे काय?” 
“म्हणजे... आपण वाचतो ना वर्तमानपत्रात... ते कास्टिंग काउच वगैरे...”
“मला असं सांग की मुलींना असे अनुभव फक्त कला क्षेत्रातच येतात का? इतर प्रकारच्या उद्योग व्यवसायात असणारी सर्व मंडळी अत्यंत सज्जन असून सर्व दुर्जन मंडळी कलाक्षेत्रातच आहेत अशी स्थिती आहे का?”
“नाही नाही... मला तसं नाही म्हणायचंय पण आपण ऐकतो ते बहुतेक वेळा कलाक्षेत्रातल्या लोकांबद्दलच ऐकतो ना...” 
“तू मघाशी वापरलेला शब्द इथे अतिशय महत्वाचा आहे. ‘सेलिब्रिटीज’. आपल्याला जे वर्तमानपत्रातून किंवा टी.व्ही.वरून जे ऐकायला मिळतं ते या सेलिब्रिटीजबद्दल असतं. कारण ते ऐकण्यामध्ये आपल्या लोकांना रस असतो. एखाद्या नामवंत कलाकाराची काळी बाजू दिसली तर आपल्याला ती बघायची असते. चघळायची असते. तुझ्या गल्लीत राहणाऱ्या पुरुषानं त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी गैरवर्तन केलं तर ते तुला माहित असण्याची शक्यता किती? नगण्य! पण हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एखाद्या दिग्दर्शकाविषयी अशी अफवा जरी निर्माण झाली तरी ती तुला माहित असण्याची शक्यता खूपच वाढते नाही का?”
“म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की हा सगळा मिडीयाचा हाईप असतो... प्रत्यक्षात असं काही सुद्धा होत नाही...”
नाही. प्रत्यक्षात असं काहीसुद्धा होत नाही असं मी अजिबात म्हणू इच्छित नाही. पण या गोष्टी सर्वच क्षेत्रात घडत असतात. आणि इतर क्षेत्रात त्या जशा घडतात तश्याच त्या कलाक्षेत्रातही घडतात. पण कलाक्षेत्र हे प्रसिद्धीचं क्षेत्र आहे. ग्लॅमरचं क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात घडणाऱ्या वाईट गोष्टींनाही भरपूर प्रसिद्धी मिळते. अनेकदा सवंग प्रसिद्धीसाठीसुद्धा अशा अफवा पसरवल्या जात असतात.”
“पण म्हणजे तुम्ही असं म्हणताय की इतर क्षेत्रातही असं होतं...”
“प्रकार वेगवेगळे असतील, पण जिथे जिथे विवेकबुद्धी हरवून बसलेले पुरुष काम करत असतात, तिथे तिथे स्त्रियांचं शोषण होण्याची शक्यता असतेच.”
“पण मग कलाक्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या माझ्यासारख्या मुलींनी काय करायचं...”
“खंबीर राहायचं घाबरायचं नाही. आपल्या मनाविरुद्ध काहीही करायला आपल्याला कुणीही भाग पडू शकत नाही यावर विश्वास ठेवायचा.”
“पण मुलींना असं केल्याशिवाय पर्यायच नसतो असंही म्हणतात...”
“कला क्षेत्रात नाव कमावलेल्या, आपला ठसा उमटवलेल्या स्त्रियांची संख्या काही कमी नाही. त्या सर्वांनी हाच मार्ग चोखाळला असेल असं तुला वाटतंय का? आजपर्यंत संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, अशा विविध कलाक्षेत्रांत अनेक कलावतींनी अफलातून काम करून ठेवलं आहे. त्या सर्वांनी कास्टिंग काउचवर सुरुवात केली असं तुला वाटतंय? त्यांच्या अंगी असलेल्या कलेचं त्यांनी घेतलेल्या अपरंपार कष्टांचं मोल काहीच नाही?”
“नाही तसं नाही. पण त्या लकी होत्या... आणि त्यांच्यापाशी टॅलेंटपण होतं...”
“आणि तुझ्यापाशी ते नाही? मग तू या क्षेत्रात येण्याचं कारणच नाही. माझ्यामध्ये टॅलेंट आहे यावर माझा विश्वास आहे की नाही यावर मी माझं करिअर कसं घडवणार ते ठरतं... आणि त्या लकी होत्या म्हणजे काय? त्यांना कष्ट न करता सगळं मिळालं का?”
“नाही. पण त्यांच्या कष्टाचं फळ देणारी माणसं त्यांना मिळत गेली.”
“मग?”
“तशी मला मिळाली नाहीत तर?”
“पण तशी तुला मिळतील की नाही हे तुला तू कष्ट केल्याशिवाय कसं कळेल? त्यांना कुणी यशाची हमी दिलेली नव्हती. त्या कलेची साधना करत गेल्या. कष्ट करत गेल्या. ‘त्याचं ते नशीब आणि आपले ते स्वकष्ट’ हे कसं काय बरं चालेल?”
“पण मग मुलींना या क्षेत्रात येण्यापासून का बरं रोखलं जातं?”
“कारण आपल्याला खात्री नसते. ‘कशाला हवी विषाची परीक्षा’ असा विचार असतो. आणि ‘मुलीला शेवटी लग्न करून नवऱ्याच्या घरीच तर पाठवायचंय, ते झालं की आम्ही सुटलो’ हा बहुसंख्य पालकांचा विचार असतो! मग कला बिला आपली लग्न जमवताना एक ‘प्लस पॉइंट’ म्हणून ठीक आहे. करिअर वगैरेची भानगड नकोच! मुळात मुलींच्या करिअरविषयी एक सामाजिक अढी आपल्याकडे आहे. त्यातून कलाक्षेत्रात करिअर म्हणजे अजूनच प्रॉब्लेम... त्यापेक्षा नकोच ते... मुलींना घाबरवून ठेवा. म्हणजे प्रश्न मिटला.”
“पण समजा अशी अयोग्य मागणी कुणी केली तर? मग मुलगी काय करणार? करिअरमधला पुढचा टप्पा गाठायला कदाचित तसं वागावं लागू शकतं आणि त्यावेळी तर समोर पर्यायच नसतो...”
“नाही म्हणायचा पर्याय नेहमीच खुला असतो! अशा वेळी नाही म्हटल्यामुळे करिअरमधला पुढचा टप्पा गाठायला कदाचित अजून थोडा वेळ लागेल. पण त्यानं काहीच फरक पडत नाही. ‘अति घाई, संकटात नेई’ अशी पाटी आपण हायवेवर नेहमी वाचतो. आपल्याला आपल्या करिअरच्या पाउलवाटेवरून हायवेवर जायचं असलं तर ‘अति घाई, संकटात नेई’ ही पाटी कधीच विसरून चालणार नाही.”
(क्रमशः)     

(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)

No comments:

Post a Comment