“मी लमाण
वाचायला सुरुवात केलीय बरं का...” बंडूनं घरात प्रवेश करता करता जाहीर केलं.
“शाब्बास. कुठवर
वाचून झालंय?”
“अजून
प्रस्तावनाच वाचतोय. आजच घेतलय...”
“आजच? की
आत्ताच?”
“आत्ताच...”
बंडू ओशाळून म्हणाला.
‘हे बघ बंडू...
तू ते वाचलंच पाहिजेस असं काही नाही. आणि माझ्याकडे आल्यावर उतार तयार असण्यापुरतं
वाचण्याची तर अजिबातच गरज नाही. तू तुझ्या करिअरचा विचार किती गांभीर्यानं करतो
आहेस त्यावर ते अवलंबून आहे.”
“पण माझं करिअर
‘लमाण’ वाचण्यावर कसं काय अवलंबून असू शकतं?”
“तुझं करिअर
‘लमाण’ वाचण्यावर अजिबातच अवलंबून नाही. पण तुला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे,
त्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं करिअर घडवलेलं आहे, ज्यांनी त्या क्षेत्राला आपलं
भरीव योगदान दिलं आहे, त्यांचे अनुभव आपल्याला उपयोगी पडू शकतील की नाही? आणि
त्यांचे अनुभव, त्यांच्या समोर निर्माण झालेले प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधून
काढलेली उत्तरं समजावून घेतली तर कदाचित आपल्याही डोक्यात काही प्रकाश पडण्याची
शक्यता आहे.”
“पण त्यांचा काल
वेगळा... त्यांचे प्रश्न वेगळे... आणि त्यांची उत्तरंही वेगळी... मग आपण त्यावर
किती वेळ घालवायचा? आपल्याला काही आपल्या उपयोगाची उत्तरं त्यातून मिळणारच नाहीत.”
“इतरांचे अनुभव
ही काही अॅटीबायोटीक्सची गोळी नव्हे. रात्रीचा ताप गोळी घेतल्यावर सकाळी गायब...
प्रत्येकजण आपापल्या अनुभवातून काहीतरी शिकत असतो. पण हे शिक्षण काही लगेच होत
नाही. अनेकवेळा आपल्या अनुभवांचे अर्थ लागेपर्यंत मध्ये काही वर्ष गेलेली असतात.
पण आपण इतरांच्या अनुभवातून समृध्द होऊ शकत नाही का? आणि शिकू शकत नाही का?
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण आपण चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेबरोबर
तिथेच सोडून द्यायची का?”
“तुम्ही काय
म्हणताय ते कळल्यासारखं वाटतंय, पण म्हणजे नक्की काय ते कळात नाहीये...” बंडू.
“हरकत नाही.
तूर्तास ‘लमाण’ वाचायला घे. आणि घाईघाईनं उत्तरं शोधात बसू नकोस. नाहीतर नुसतीच पानं
उलटत राहशील आणि हाती काहीच लागणार नाही...”
“हो. पण एक
विचारू का?”
“जरूर.”
“तुम्ही नेहमी
काहीतरी वाचायला का सांगता? मला प्रश्न पडला आहे की मी आयुष्यात नक्की काय
करावं... जरी माझं आता तसं ठरलेलं असलं की अभिनयातच करिअर करायचं तरी अशी पुस्तकं
वाचून काय होणार? इतिहासाची माहिती होईल हे बरोबर. ते किती थोर आहेत ते सुद्धा
कळेल. पण माझ्या करिअरसाठी त्याचा काय उपयोग? मॅनेजमेंट आणि बिझनेसच्या मुलांसाठी
किती छान छान पुस्तकं असतात. ‘यशस्वी होण्याचे एकशे एक मार्ग’ किंवा ‘पैसा
मिळविण्याचे एक हजार एक मार्ग’... तशी काही पुस्तकं कुणी का बरं लिहित नाही
नाट्यक्षेत्रासाठी?
“बंडू, ज्याला
यशस्वी होण्याचे एकशे एक मार्ग किंवा पैसा मिळविण्याचे एक हजार एक मार्ग माहित
आहेत तो हे पुस्तक लिहिण्यात का बरं वेळ घालवतोय?”
“अं...?”
“तो त्याचं
करिअर घडवण्याच्या मागे आहे. त्याला लेखक व्हायचं असेल कदाचित... त्याला रॉयल्टी
मिळते प्रत्येक पुस्तक खपलं की. पण कुठल्याही गावातल्या कुठल्याही कोपऱ्यावर ही
पुस्तकं विकणारा पुस्तक विक्रेता का बरं ते एकशे एक किंवा एक हजार एक मार्ग न धरता
हे पुस्तक विकायला बसतो?”
“पण मग ‘लमाण’
वाचून काय फायदा?” बंडू आपला मूळ मुद्दा सोडायला तयार नव्हता.
“फायदा तोटा तू कसा
मोजायचा ठरवतोस त्यावर ते अवलंबून आहे. तुला जर ताबडतोब उत्तरं हवी असतील तर लमाण वाचण्याचा
काहीच फायदा होणार नाही कदाचित. तसा मग आपल्या या बोलण्याचाही काही फारसा फायदा होणार
नाही. आणि फक्त ‘लमाण’ असंच नाही, तर कुठलंही आत्मचरित्र आपल्याला आयुष्याविषयी काही
एक दृष्टी देऊन जातं. आपल्या आयुष्याकडे, आपण घेत असलेल्या निर्णयांकडे अधिक सजगपणे
पाहायला शिकवतं. आणि महत्वाचं म्हणजे चरित्रं किंवा आत्मचरित्रं याच जगात घडलेली असतात.
ती काल्पनिक नसतात. ती खोटी नसतात. त्यातली माणसं खरी असतात. आणि अनेकदा वास्तवातल्या
गोष्टी या काल्पनिक जगापेक्षा अधिक आश्चर्यकारक असतात. आणि आपण जेंव्हा अशी पुस्तकं
वाचतो तेंव्हा या माणसांची आयुष्यं कशी घडली ते तर आपल्याला दिसतंच पण त्यांनी त्यांच्या
करिअरसाठी कोणत्या वाट चोखाळल्या तेही दिसू लागतं. आणि मग असंही लक्षात येतं की ‘अरे!
यांच्यासमोर या वाटा आधीपासून नव्हत्या काही! त्यांच्या चालाण्यातूनच ही वाट पडत गेली
आहे. त्यांच्या पावलांनीच तर या पायवाटा तयार झाल्या आहेत.”
“पण मग असं एखादं
पुस्तक नाही का की जे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल...?”
“तसं पुस्तक तुझं
तुलाच लिहावं लागेल. कारण तुझं करिअर तुला कसं घडवायचं आहे हे फक्त तुलाच ठरवता येऊ
शकतं. तुझे प्रश्न फक्त तुलाच माहित असणार आहेत आणि त्यांची उत्तरंही तुलाच शोधून काढावी
लागणार आहेत. आणि हे पुस्तक लिहिण्याचं काम आयुष्यभर करावं लागणार आहे हे पण लक्षात
ठेव. तू जेवढा अधिक विचार करशील, जेवढा डोळसपणे चालायला सुरुवात करशील त्यावर हे अवलंबून
आहे.”
“पण मग हे करायचं
कसं...?”
एव्हाना चांगलाच
उशीर झाला होता. मी बंडूला म्हटलं, “आपण पुढच्या वेळी बोलूया का? आज खूप उशीर झालाय
आता.”
“हो. आणि तोपर्यंत
मी ‘लमाण’ही वाचायला सुरुवात करतो.”
“ते तर करच. पण तुझं
पुस्तक कसं लिहायला घ्यायचं त्याचाही विचार कर. भेटूच पुन्हा!”
(क्रमशः)
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)
No comments:
Post a Comment