एका रविवारी भल्या सकाळी एक बंडू माझ्या घरी आला.
पॅटीस खाता खाता मला म्हणाला, “मला जरा तुमच्याशी बोलायचं.”
मी म्हटलं, “इतका वेळ आपण बोलतोच आहोत की.”
बंडू हसला. म्हणाला, “तसं नाही. मला जरा सविस्तर बोलायचंय. म्हणजे माझ्या आयुष्याविषयी.”
खरं म्हणजे मी जरा गडबडलो. सतरा-अठरा वर्षांचा एखादा बंडू अचानक आयुष्याविषयी बोलू लागला की मी गडबडतो. पण थोडसं बरंही वाटत. मी म्हटलं “बरं. आपण आयुष्याविषयी बोलूया. बोल.”
बंडूनं बोलायला सुरुवात केली. “गेले काही दिवस मी विचार करतो आहे. मला आयुष्यात नक्की काय करायचं आहे ते मला नीटसं समजत नव्हतं. मी खूप विचार करायचो. खूप वाचन करायचो. मनन चिंतन करायचो. पण तरीही काही उमगत नव्हतं की मला नक्की काय करायचं आहे. कधी वाटायचं की सी.ए. व्हावं, तर कधी एम.बी.ए. पण काल रात्री अचानक माझ्या लक्षात आलं की मला काय करायचंय...”
“शाब्बास. काय लक्षात आलं तुझ्या?”
“मला कलाकार व्हायचंय.”
“अरेव्वा! पण असं अचानक कलाकार व्हायचं कुठून डोक्यात आलं? आणि कलाकार म्हणजे नक्की काय करायचंय तुला? गायक, वादक, नर्तक, अभिनेता, दिग्दर्शक, चित्रकार...”
“मला अभिनेता व्हायचंय...”
“का?”
“कारण मला अभिनयाची फार आवड आहे. मला लहानपणापासूनच आवड आहे असं म्हटलं तरी चालेल...”
“असं म्हटलं तरी चालेल? पण असं का बरं म्हणायचं?
“का म्हणजे काय? होतीच आवड... का ते कसं सांगणार...?”
“माझा प्रश्न तुझ्या लक्षात आलेला नाही. माझा प्रश्न ‘आवड का होती’ असा नसून ‘आवड होती का’ असा आहे. आणि आवड होती म्हणतोयस तर ती आवड जोपासण्यासाठी तू काय केलं आहेस आत्तापर्यंत?”
“म्हणजे काय? आमीर खान माझा फेव्हरीट अॅक्टर आहे. मी त्याचे सगळे सिनेमे पाहिलेत. गोविंदा मला आवडत नाही. त्याचा एकाही सिनेमा मी पाहिलेला नाही. मी गेल्या वर्षी ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेमध्ये आमच्या कॉलेजचं नाटक बघायला पण गेलो होतो. या वर्षी फिरोदियाच्या वेळी पण चिअरिंग करायला जाणार आहे. माझा आवाज चिअरिंगसाठी सॉलिड आहे. त्यामुळे सगळ्यांना मीच यायला हवा असतो. भरत नाट्य मंदिरात मी आवाज लावला ना की सगळ्यांना एकदम जोर येतो. मला सगळे म्हणतात की मी सही अॅक्टर होऊ शकेन. तुम्ही तर मला पूर्वीपासून ओळखता! त्यामुळे काल रात्री जेंव्हा माझं ठरलं की आपण कलाकार व्हायचं तेंव्हा मला पहिल्यांदा तुमचीच आठवण झाली. मी माझं हे ध्येय साकारण्यासाठी कितीही कष्ट करायला तयार आहे. मी वडा पाव खाउन दिवस काढेन. फूटपाथवर झोपेन. पण मी अभिनेता होणारच...!”
एव्हाना त्याच्या बशीमधले पॅटीस संपले होते. मी पॅटीसची दुसरी बशी त्याच्या समोर सरकवली आणि चहाचा एक घोट घेत विचारता झालो, “पण तू स्वतः कधी स्टेजवर जाऊन अभिनय केला आहेस का?”
तो हसला. म्हणाला, “पोलिटीक्स असतं ना... त्यामुळे अजून संधी आली नाही कधी...”
“ पण मग संधीची वाट केंव्हापर्यंत पहायची ठरवली आहे?”
“आता वाट पहायची नाही असंच ठरवलय. आता डायरेक्ट उडी मारायची...”
“पण म्हणजे नक्की काय करायचं?”
“अं...? म्हणजे पूर्ण वेळ अभिनय...”
“म्हणजे?”
“म्हणजे...?...?” पॅटीसचा शेवटचा तुकडा त्याच्या तोंडातच रेंगाळत होता. मी चहाचा कप त्याच्यापुढे केला.
“हे बघ. मी तुला एक गोष्ट सांगतो. माझ्या एका कार्याशाळेमध्ये एक ज्येष्ठ अभिनेते मुलांशी गप्पा मारायला आले होते. त्यांना एका मुलानं विचारलं की सर, मला खूप असं वाटतं की पूर्ण वेळ अभिनेता व्हावं. पण निर्णय घेता येत नाही. तो कसा घ्यायचा ते कळत नाही. तुम्ही मार्गदर्शन करा. ते म्हणाले, ‘अरे फार सोपं आहे. एक तराजू घ्यायचा. त्याच्या एका तागडीमध्ये आपलं हे जे काही वेड किंवा ध्येय आहे ते टाकायचं. आणि दुसऱ्या बाजूच्या तागडीमध्ये आपले आई-वडील, नातेवाईक, हितचिंतक, मित्र मैत्रिणी यांना टाकायचं. आणि असा विचार करायचा की जर आपण यशस्वी झालो तर आपली बाजू जड होणार. आणि या सगळ्यांना आभाळाएवढा आनंद होणार. पण जर आपण अयशस्वी झालो, तर आपली बाजू हलकी होणार. आणि आपल्या अपयशाचं या सगळ्यांना दु:ख होणार. त्यांना होणारं दु:ख बघण्याची ताकद या माझ्या वेडामध्ये आहे का? माझ्यामध्ये आहे का? याचं उत्तर मिळवण्यासाठी त्या तागडीमधल्या प्रत्येकाकडे निरखून बघावं लागतं... प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून बघावं लागतं... आणि मग उत्तर शोधावं लागतं... ती ताकद असेल तर खुशाल उडी मारायची... नसेल तर टी गोळा करेपर्यंत वाट बघण क्रमप्राप्त आहे.’ आणि पुढे ते म्हणाले, ‘ आला स्वतःला जेंव्हा असं लक्षात आलं की आपल्याला नाटकच करायचं आहे तेंव्हापासून माझं पाहिलं व्यावसायिक नाटक येईपर्यंत सुमारे तेवीस वर्षं जावी लागली...”
बंडू चहाच्या कपाकडे बघत शांतपणे ऐकत होता.
“बंडू, नाटक करावसं वाटणं ही एक गोष्ट झाली. आणि ते प्रत्यक्ष करणं ही दुसरी गोष्ट झाली. आणि नाटक किंवा अभिनयामध्ये करिअर करणं ही तिसरी गोष्ट झाली. तू आत्ता पहिल्या टप्प्यावर आहेस, नाही का? अजून पुष्कळ वाट चालून व्हायची आहे. ती चालायला सुरुवात केलीस तर पुढे जाता येईल. मग आयुष्य ही केवळ बोलण्याची गोष्ट राहणार नाही. ती एक आनंदानं अनुभवण्याची गोष्ट होऊन जाईल.”
मी चहाचा रिकामा कप खाली ठेवला.
“तुम्ही म्हणता ते थोडं थोडं माझ्या लक्षात येतंय. पण मला नीट समजायला थोडा वेळ लागेल. मी पुन्हा तुमच्याकडे येऊन तुम्हाला थोडा त्रास दिला तर चालेल ना...”
“अर्थात! केंव्हा भेटूया परत? पुढच्या आठवड्यात कि पुढच्या महिन्यात?”
“नाही नाही... पुढच्या आठवड्यातच भेटूया.”
“चालेल. आणि येण्यापूर्वी डॉ. लागूंचं ‘लमाण’ वाचून ये बरं का...”
बंडूनं चहा संपवला आणि तो निघाला. मला मनातून बरं वाटत होतं की हा बंडू निदान विचार करायला तयार आहे!
(क्रमश:)
(पूर्व प्रसिद्धी: महाराष्ट्र टाइम्स)
Very nice and helpful article. I remember... I read it in newspaper looong ago... :)
ReplyDeleteAani ho.... Laguncha "Lamaan" vachla Barr Ka sir... :)@