Monday, June 23, 2014

बंडूची गोष्ट: कला, कला-शिक्षण आणि कला-व्यवसाय (सात)

“मला वाटतं की आपण एकूणातच कला या गोष्टीला फार लाईटली घेतो. कला म्हणजे मनोरंजन या कल्पनेशी आपण थांबतो आणि कलेचा विचार गांभीर्यानं अजिबात करत नाही.” इति बंडू.
“अभिनंदन. आज तू खरंच विचार करून आलायस बंडू. पण मला असं सांग की कला म्हणजे मनोरंजन नाहीये?”
“आहे ना. पण कला म्हणजे ‘नुसतंच’ मनोरंजन नाही.”  
“मग?”
“त्यात एक विचार पण आहे.”
“पण म्हणजे नेमकं काय?”
“म्हणजे असं की... मला वाटतं की कला म्हणजे मनोरंजन आहे पण ते बिनडोक मनोरंजन नाही.”
“अरे वा... आज तू खूपच विचार करून आलेला दिसतोयस.”
“होय... म्हणजे तसं वाटतंय खरं... तर कलेमध्ये जर डोकं पण वापरता आलं तर कलाकाराला तर मजा येतेच पण त्याबरोबरच त्या कलेचा आस्वाद घेणा-याला पण येते.”
“उदाहरण दे बघू...”
“उदाहरणार्थ एखादा विनोदी नट आपल्या अंगभूत टायमिंग साधण्याच्या कौशल्यामुळे हशा वसूल करतो. प्रेक्षक हसतात. पण तो पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीनं टायमिंग केंव्हा साधू शकेल? जेव्हा तो आपल्या पहिल्या अनुभवाची चिरफाड करेल तेंव्हा. ही चिरफाड करणं फार काही जिकिरीचं असतं अशातला भाग नाही. पण त्यासाठी थोडंसं स्वतःच्या आत डोकावून बघावं लागेल. आणि त्याच वेळी बाहेर होत असलेल्या परिणामांकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल.”
“उत्तम. तू तुझं पुस्तक लिहायला सुरुवात केली आहेस असं म्हणायला हरकत नाही. शाब्बास. मग आता प्रश्न कुठे आहे?”
“प्रश्न असा आहे की कला शिक्षण घेतल्यामुळे या गोष्टी कशा करायच्या ते शिकता येतं का? आणि असं शिकवणं आणि शिकणं खरोखरंच शक्य आहे का?”
“हं. हा प्रश्न आहे खरा. बंडू, तू कधी दामू केंकरे यांचं नाव ऐकलं आहेस का?”
“नाव ऐकलं आहे पण ते खूपच सिनिअर होते ना... त्यामुळे त्यांचं काही काम पाहिलेलं नाही.”
“हरकत नाही. हल्लीच्या काळात नाव ऐकलं आहेस हेसुद्धा खूप आहे. दामूकाका अप्रतिम आणि अफलातून दिग्दर्शक होते. मुख्य म्हणजे त्यांच्या काळात जे काही विचारपूर्वक नाटक करणारे आणि तरीही मनोरंजनाला बाजूला न सारणारे मोजके दिग्दर्शक होते त्यांचे दामूकाका अध्वर्यू. त्यांनी एकदा बोलताना कलाशिक्षणाविषयी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकवायला जात असत. त्यांच्या पहिल्या लेक्चरची सुरुवात ते नेहमी एकाच वाक्यानं करीत असत. ‘कला ही शिकवता येत नाही...’ या वाक्यानंतर वर्गातले विद्यार्थी अचंब्यात पडत. सर्वांना वाटे की अरे... आपण तर इथे कला शिक्षण घ्यायला आलो आहोत. जे.जे. सारख्या नामांकित कला महाविद्यालयात आलो आहोत. आणि पहिल्याच तासाला हा मनुष्य हे काय सांगतोय... मग दामूकाका त्यांच्या वाक्याचा उत्तरार्ध पूर्ण करीत, ‘... पण कला ही शिकता येते. कला ही शिकवता येत नाही, पण ती शिकता येते!’ त्यांनी हे जेंव्हा मला सांगितलं तेंव्हा मी त्यांना विचारलं की मग शिक्षक म्हणून कला शिक्षकानं काय करायला हवं? काय करणं अपेक्षित आहे? त्यावर ते म्हणाले, “शिक्षकाची जबाबदारी फारच मोठी आहे. वर्गातल्या ज्या विद्यार्थ्याला शिकायचं आहे त्याला शिकता येईल अशी परिस्थिती वर्गात निर्माण करीत राहणं हे शिक्षकाच्म कौशल्य आहे!’ म्हणजेच ‘हे मी शिकवतो आहे’ असा विचार न करता ‘काय केले असता ज्याला शिकायचे आहे त्याला शिकता येईल’ हा विचार कलाशिक्षकाने करणे अतिशय महत्वाचे आहे. शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्याला अधिकाधिक सकस अनुभवांचे खाद्य पुरविणे ही चांगल्या कला शिक्षकाची जबाबदारी आहे.”
“पण मग सर्व कलाशिक्षण संस्थांमध्ये असा विचार करणारे किंवा असा विचार माहित असणारे शिक्षक असतात का?”
“दुर्दैवानं नसतात.  आणि त्याहीमुळे अनेकदा कला शिक्षणावरचा विश्वास उडत जातो. कला शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या सर्वांनाच हे शिक्षण कुठे घ्यावे असा प्रश्न भेडसावत असतो. आणि मग अशी जागा न समजल्यामुळे कला शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नशीब आजमावण्याकडे कल वाढतो. आणि मग त्यातूनच ‘कुणीतरी गॉडफादर हवा’ किंवा ‘एक ब्रेक मिळायला हवा’ अशी वाक्यं तयार होत जातात. या वाक्यांमध्ये ‘मी करण्यासारखे काही नाही. सारे काही इतरांच्या हाती आहे’ हा मूळ अर्थ असतो. म्हणजे माझ्या निर्णयाची जबाबदारी मुळातच इतरांवर ढकलायला मी मोकळा. आणि यातून स्वतःला प्रश्नही विचारायला लागू नयेत म्हणून ‘या क्षेत्रात असंच असतं’ असं म्हणत मी माझं समाधानही करून घेऊ लागतो.”
“मी आपल्या आधीच्या गप्पांमध्ये उच्चारलेली जवळ जवळ सगळी वाक्यं तुम्ही नीटच खोडून काढली आहेत...”
“पण मुद्दा तुझी वाक्यं खोडण्याचा नाही. तर कलाशिक्षणाकडे विद्यार्थ्याने आणि कला शिक्षकाने कसे पाहावे हा आहे. अनेक कला शिक्षक असेही असतात की ज्यांना खरं म्हणजे यशस्वी कलाकार म्हणून नाव मिळवायचं असतं. विविध कारणांमुळे ते साध्य झालेलं नसतं. मग नाईलाज म्हणून ते शिक्षक होतात. आणि तिथेच सगळा घोटाळा होतो. कारण आता स्वतःच्या अपयशाची जबाबदारीही झटकायची असते आणि त्याच वेळेला कलाकार म्हणून मोठेपणाही हवा असतो. शिक्षक म्हणवून घ्यायची तयारी नसते आणि प्रत्यक्षात मात्र रोजच्या रोज शिकवण्याचंच काम करावं लागतं. या सगळ्या गदारोळात ना स्वतःचे भले होते न विद्यार्थ्याचे.”
“पण मग ज्याला मनापासून शिकायची इच्छा आहे त्याने काय करावे?”
“डोळे उघडे ठेवून निर्णय घ्यावेत. जिथे शिकायला जायचे असेल तिथला अभ्यासक्रम काय आहे ते पाहावे. तिथे शिक्षक कोण आहेत ते पाहावे. हे शिक्षक नाईलाजाने झालेले शिक्षक नाहीत न हेसुद्धा तपासून पाहावे. अशा अनेक संस्थांमध्ये मार्केटिंगच्या हेतूने अनेक नामांकित कलावंतांची यादी ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ म्हणून दिली जाते. अशी मंडळी एक दोन तास जरी येऊन गेली किंवा एखादा दिवस येऊन गेली तरी ती ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ असतात! तिथे नियमितपणे कोण शिकवणार आहे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? ते स्वतः प्रशिक्षित आहेत का? ते फावल्या वेळात शिकवतात की शिकवणे हा त्यांचा मूळ उद्योग आहे? या सर्व गोष्टी बघायला हव्यात. आणि या सर्व गोष्टींची उत्तरे मिळाल्यावर डोळे उघडे ठेवून निर्णय घेणे आवश्यक ठरते.”
“हं... म्हटलं तर सोपं आहे... म्हटलं तर अवघड आहे...”
“म्हणून तर मी अगोदरच म्हटलं होतं की एकदम आयुष्यविषयक बोलण्यापेक्षा एकेक मुद्दा धरून बोलूया...”

(क्रमशः)     

(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)

No comments:

Post a Comment