एक बंडू होता.
या बंडूचं अभ्यासात फारसं लक्ष लागत नसे. वर्गात बसल्यावर याचं आपल लक्ष सारख खिडकीबाहेर. त्या दोन झाडांच्या
पानांचा रंग हिरवाच पण वेगवेगळा हिरवा कसा? सूर्यासारखा प्रकाश पाडायला किती
व्होल्टेजचा दिवा लागेल? त्या दोन चिमण्या एकमेकींशी काय गप्पा मारत असतील? त्या
पलीकडच्या ढगावर मला बसता येईल का? आणि तिथून माझी शाळा कशी दिसेल? असे अनेक
प्रश्न त्या खिडकीबाहेर उभे असत... वाकुल्या दाखवीत.
बंडूला नेहेमी
प्रश्न पडे की हे प्रश्न महत्वाचे की बाईंनी दिलेले घरच्या अभ्यासाचे? दोन
आगगाड्या एकमेकांशेजारून जात असल्या, तर त्या वेगातील फरक लक्षात घेऊन, त्या किती
सेकंदात एकमेकांना ओलांडून जातील याचा विचार करण्यापेक्षा त्यातल्या एका आगगाडीतून
दुसरी आगगाडी कशी दिसेल याचा विचार करायला त्याला जास्त मजा यायची.
बंडूला
गोष्टींची पुस्तकं वाचायला खूप आवडायचं. आणि त्यात चित्रं असली तर फारच धमाल...
फास्टर फेणे, बिपीन बुकलवार पासून फेलुदा आणि शेरलॉक होम्सपर्यंत असंख्य मंडळींशी
त्याची गट्टी जमली होती. बंडू थोडा मोठा झाल्यावर त्याला मोठमोठ्या लोकांची चरित्रं
वाचायचा नाद लागला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून चार्ली चाप्लीन पर्यंत आणि
अब्राहम लिंकन पासून आंबेडकरांपर्यंत अनेक थोरामोठ्यांची चरित्रं बंडूनं वाचून
काढली. अब्राहम लिंकनचं शाळेतल्या गुरुजींना लिहिलेलं पत्र तर त्यानं पाठच करून
टाकलं होतं. कधीमधी तो इतरांना ते म्हणूनही दाखवीत असे. त्याने वर्गात जेंव्हा
पहिल्यांदा ते पत्र म्हणून दाखवले तेंव्हा त्याच्या गुरुजींनी त्याचे कौतुक केले
होते पण त्यांच्या डोळ्यांमध्ये थोडीशी नाराजी चमकून गेल्याचा भास झाला होता.
असा हा बंडू
अजून थोडा मोठा झाला. आणि एक भला मोठा प्रश्न त्याच्या दिशेने सारखा येऊ लागला. ‘मग...? पुढे काय करायचा विचार आहे...?’ हा तो प्रश्न.
बहुतेक सर्व मोठी माणसे बंडूला हा प्रश्न विचारण्यात आणि त्याच्याकडे ठोस उत्तर
नाही असे बघून स्वतःचा चेहरा आंबट करण्यात व्यग्र होती. एव्हाना बंडूने अनेक
नाटिकांमधून कामे केली होती. चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या. त्याला संगीताची
आवड होती. कुमार गंधर्व आणि लता मंगेशकर या दोघांचेही गाणे तो तितक्याच तन्मयतेने
ऐकत असे. अधूनमधून गुणगुणत देखील असे. त्या नादाने तो तबला वाजवायलाही शिकला.
हार्मोनियमवर अधून मधून हात साफ करून घेतला. अनेकदा संध्याकाळी तो कलादालनातही
चक्कर मारीत असे. तिथली चित्रं त्याला पुन्हा एकदा त्याच्या शाळेतल्या खिडकीबाहेर
उभ्या असलेल्या प्रश्नांची आठवण करून देत.
पण या
सगळ्यामधून बंडूला ‘मग...? पुढे काय करायचा विचार आहे...?’ या प्रश्नाचे ठोस उत्तर मात्र काही केल्या मिळत नव्हते.
बंडूचा मामेभाऊ
इंजिनिअरिंगला होता. तो पुढे एम. बी. ए. करण्यासाठी अमेरिकेला जाणार होता. बंडूची
चुलतबहीण मेडिकलला होती. बंडूचा सख्खा मित्र आय. सी. डब्ल्यू. ए. करत होता आणि सी.
ए. करणार होता. बंडूची आवडती मैत्रीण मायक्रोबायोलॉजी करणार होती. बंडूच्या शेजारी
राहणारा विवेक आय. टी. मध्ये काहीतरी करण्यासाठी आय. आय. टी. ला ट्राय करणार होता.
बंडूचा अजून एक मित्र यु. पी. एस. सी. ची परीक्षा देणार होता. बंडू समोरचे
प्रश्नचिन्ह मोठ्ठे होत जात होते. आणि एकाही उद्गार चिन्हाचा आसमंतात कुठेच पत्ता
नव्हता.
असे खूप बंडू
आपल्या आजूबाजूला असतात. काही वेळा आपणच बंडू आहोत की काय असंही वाटून जातं. या
बंडूना आपण काय करावं ते नीटसं कळलेलं नसतं. आणि जे कळलेलं नाही ते कळलेलं आहे असं
भासवून खोटं खोटं जगायची त्यांची तयारी नसते. आणि त्यातून जर अशा बंडूंना नाटक,
नृत्य, संगीत, चित्र, शिल्प अशा कुठल्या कलेची आवड असली तर? ‘मग...? पुढे काय करायचा विचार आहे...?’ या
प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘पुढे चित्रकार व्हायचं ठरवलंय’ किंवा ‘नट व्हायचं ठरवलंय’ असा उत्तर बंडूनं दिलं तर? तर प्रश्न विचारणारा चेहरा अधिकच आंबट होण्याची
शक्यता अधिक.
मग अशा बंडूनं
करायचं तरी काय? कला आणि कलाशिक्षण या गोष्टी आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्याच्या
कुंपणावरच बसवून ठेवतो. काहीवेळा कुंपणापेक्षा वेशीवर टांगणेच आपल्याला अधिक रास्त
वाटते. पण काहीजण मात्र या गोष्टींनीच आपले आयुष्य व्यापून टाकतात. डोळसपणे निर्णय
घेऊन कलेचे शिक्षण घेतात. आपल्याला खरोखरच काय करायचे आहे ते हुडकून काढतात. हे कसं
करायचं? बंडूला कलाशिक्षण घ्यायचं आहे की नाही हे बंडूनं कसं काय बुवा ओळखायचं?
आणि कलेच्या क्षेत्रात करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं? आणि हे वेळेवर
लक्षात आलं नाही तर?
या आणि अशा
सर्व प्रश्नाचिन्हांकडे पहात उद्गार चिन्हे रेखाटण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...
(क्रमशः...)
(पूर्व
प्रसिद्धी: महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment