“तेंव्हा थोडक्यात काय बंडू, तर आपण आपल्या प्रगतीचा विचार
कसा करतो यावर आपण करिअरचा विचार कसा करणार ते ठरत जातं.”
“पण जर करीअरच ठरलेलं नसेल तर प्रगतीचा विचार कसा काय
करणार? ते आधी ठरवायला नको का?”
“बरोबर. आणि त्यासाठीच तर आपली बडबड चालू आहे! प्रश्न असा
आहे की मला काय करायचं आहे हे ठरवताना मी काय काय विचार करत असतो?”
“मी असा विचार करतो की मला अभिनयात करिअर करायचं आहे. मग
त्यासाठी मला कुठेतरी ब्रेक मिळायला पाहिजे. कुणीतरी दर्दी कलावंतानं माझ्यातले
कलागुण हेरून मला संधी द्यायला पाहिजे. किंवा कुणीतरी माझ्यापाठीमागे गॉडफादर
म्हणून उभं राहिलं पाहिजे. निदान मला एखाद्या युवा दिग्दर्शकानं तरी मला त्याच्या
एखाद्या नाटकात महत्वाची भूमिका द्यायला पाहिजे...”
“बंडू, तू आत्ता जे बोललास त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ
‘तुझ्या करिअरसाठी इतर कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे’ असा होतोय नाही का? कुणीतरी
मला संधी दिली पाहिजे... कुणीतरी गॉडफादर झालं पाहिजे... कुणीतरी भूमिका दिली
पाहिजे... इतर कुणीतरी असं काहीतरी केलं पाहिजे की मला फारसे किंवा अजिबातच कष्ट न
करता सुग्रास भोजन मिळालं पाहिजे... अच्युत वझे नावाच्या एका लेखकानं लिहिलेलं एक
नाटक आहे. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक...’ नाही नाही. ते बालनाट्य नाहीये.
त्यातल्या हीरोचं नाव आहे ‘वांधेकर’. हा वांधेकर सारखा म्हणत असतो, ‘कॅत्री केलं
पॅजे’... काहीतरी केलं पाहिजे... आणि त्याला लगेच पुढचा प्रश्न पडतो की ‘कॅ ब्र
करावं?’... काय बरं करावं? या दोन वांझ विचारांच्या कात्रीत सापडलेलं ते पात्र
आहे. ते नाटक एकदा मिळवून वाच!”
“वांधेकर... फार डेंजर नाव आहे हे... वांधेकर...”
“भिऊ नकोस. तुझा अजून तरी वांधेकर झाला नाहीये. आपला मूळ
प्रश्न असा आहे की मला काय करायचं आहे हे ठरवताना मी काय काय विचार करत असतो...”
“मला कळत नाहीये की मी खरच विचार करत असतो की नुसताच डे
ड्रीमिंग करत असतो... विचार करणं आणि स्वप्नरंजन यातला फरकच कळेनासा होतोय मला.”
“होतं असं कधी कधी. करिअर वगैरेच्या दिशेनं आपण नंतर जाऊ.
पण कशातही करिअर करायचं म्हटलं तरी आपल्याला काही टप्पे पार करावे लागतात. त्यातला
पहिला टप्पा म्हणजे स्वतःचे ध्येय स्वतः ठरविणे.”
“ध्येय. फार मोठा शब्द आहे हो हा... ध्येय...”
“पण त्याला आपण घाबराण्याचं कारण नाही. आणि महत्वाची गोष्ट
म्हणजे स्वतःचं ध्येय स्वतःच ठरवायचं. इतर कोण काय म्हणताय त्यावर स्वतःचं ध्येय
ठरवता येत नाही. किंवा ठरवलं जाऊ शकतं पण मग कदाचित ते स्वतःचं ध्येय राहत नाही.
तू अभिनय करायचा म्हणतोस ते का बरं? कुणीतरी तुला सांगितलं कि तुला हे जमेल
म्हणून, की तुला खरोखर तसं वाटतंय?”
“पण नुसतं ध्येय ठरवून काय उपयोग..?”
“काहीच नाही. त्यामुळे ‘ध्येय ठरविणे’ हा फक्त पहिला टप्पा
झाला. आता यानंतर स्वतःला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा की हे ध्येय सध्या करणे ही
माझी गरज झाली आहे का? ‘आपले ध्येय सध्या करण्याची गरज भासणे’ ही अत्यंत महत्वाची
गोष्ट आहे. अशी गरज जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण आपल्या ध्येयाच्या
दिशेने एकही पाउल टाकण्याची शक्यता नाही. अभिनय करणे ही तुझी गरज झाली आहे का याचा
विचार कर. आणि अभिनयाच्या बाबतीत अजून एक महत्वाचा प्रश्न. अभिनय करणे ही तुझी गरज
आहे की प्रसिद्धीचं, ग्लॅमरचं आकर्षण आहे हे सुद्धा तपासून बघायला हवं. एकदा हे
ध्येय साध्य करण्याची गरज निर्माण झाली की ‘त्यासाठी प्रयत्न करणे’ ओघानेच आले. हे
प्रयत्न करत असताना आपण ‘यशापयशाचा अंदाज घेणे’ हा पुढचा टप्पा. हा अंदाज का
घ्यायचा? तर त्यामुळे आपल्या वाटेत असणारे अडथळे आपल्याला दिसू लागतात. आणि लक्षात
ठेव, हे अडथळे जसे परिस्थितीमधले असू शकतात तसेच ते आपल्या आतूनही येणारे असू
शकतात.”
“आपल्या आतून म्हणजे...?”
“म्हणजे आपल्याला विचार करण्याच्या पद्धतीमधून. या ‘अडथळ्यांवर
मात’ करण्यासाठी आपल्याला काही वेळा मदत मागावी लागते. आता ‘मदत मागणे’ म्हणजे
कमीपणा असं जर मला वाटत असेल तर मी माझ्यासाठीच अडथळा निर्माण करतो, नाही का? हा
आपणच आतून निर्माण केलेला अडथळा! आणि मग या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम काय असतो ते
सांग पाहू...”
“यश! निर्भेळ यश!” बंडू.
“किंवा अपयश! निर्भेळ अपयश!” मी.
“पण अपयश आलं तर मग काय उपयोग?” बंडू बावरून म्हणाला.
“शाळेत आपण सुविचार वाचतो की ‘अपयश ही यशाची पहिली पायरी
आहे’...! पण प्रत्यक्षात मात्र मला ती पायरी गाळून वरती उडी मारायची असते. असं कसं
काय जमेल बुवा?”
“”पण मग ‘अपयशी’ असा शिक्का नाही का बसणार?”
“बसेलही कदाचित. पण केंव्हापर्यंत? असं निर्भेळ अपयश आलं तर
आपण काय करायला हवं? या अपयशाचा अभ्यास करायला हवा. आपलं कुठे चुकलं ते तपासायला
हवं. त्यातून शिकायला हवं आणि पुन्हा पहिल्यापासून कामाला लागायला हवं. तर तू
म्हणालास तो शिक्का पुसायला काही फार अवधी लागणार नाही.”
“हे करिअर प्रकरण फारच अवघड आहे.”
“म्हटलं तर अवघड आहे. म्हटलं तर सोपं आहे. तू काय म्हणायचं
ठरवतोस त्यावर बरंच काही अवलंबून आहे. करिअरसुद्धा!”
(क्रमशः)
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)
No comments:
Post a Comment