“आपल्याला नक्की काय करायचं आहे हे कसं ओळखायचं?”
“चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर भल्याभल्यांना
आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत मिळत नाही. आणि अनेकदा माणसं निवृत्त होताना
आपल्याला खरं म्हणजे काय करायचं होतं याचा पाढा वाचतात. म्हणजे एखादा आय.ए.एस.
सर्व्हिसमधून निवृत्त झालेला अधिकारी म्हणतो, ‘खरं म्हणजे मला लेखक व्हायचं होतं.’
एखादा निवृत्त न्यायाधीश म्हणतो, ‘मला खरं तर चित्रकार व्हायचं होतं.’ आणि अनेकदा
हे आपण ओळखलेलं नसतं असं नाही बरं का. पण जे आपण ओळखलेलं असतं ते उच्चारायची
आपल्याला भीती वाटत असते.”
“पण गेल्या काही दिवसांत तुमच्याशी बोलल्यावर मी खूप विचार
करतो आहे. आणि मला हा प्रश्न फारच सतावतो आहे की मला खरंच काय करायचं आहे. मला
खरंच अभिनयात करिअर करायचं आहे का? की मला एम.बी.ए. करायला जास्त आवडणार आहे? की
मला सायकॉलॉजीमध्ये एम.ए. करायला आवडेल? आणि तरी हा विचार मनात चालूच राहतो की पण
खरं म्हणजे मला अभिनयच करायचा आहे...”
“हं... त्याचं काय आहे, की लहानपणापासून आपले बहुतेक सगळे
निर्णय इतर कुणीतरी घेतलेले असतात. आणि त्यामुळे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि
त्यांच्या परिणामांची जबाबदारी आपल्यावर कधी नसतेच! अगदी शाळेत असताना सुद्धा असंच
होत असतं. आपण कुठले विषय शिकायचे ते ठरलेलं असतं. दहावीनंतर काय करायचं याचा
निर्णय वरकरणी जरी आपण घेत असलो तरी प्रत्यक्षात आपण घेतो का हे तपासून बघायला
हवं. भरपूर टक्के असले की सायन्स... थोडे कमी असले तर कॉमर्स, आणि त्याहूनही कमी
असले तर आर्ट्स! अर्थात यालाही काही अपवाद असतातच. पण ते अपवादच असतात! जितके लाख
विद्तार्थी या परीक्षेला बसतात त्या संख्येच्या तुलनेनं ही संख्या फारच नगण्य
असते. पुढे बारावी झाल्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंगची भुतं आपल्यापुढे नाचत असतात.
कॉमर्स आणि आर्ट्सवाल्यांना या टप्प्यावर फारसं काही करावं लागतं नाही. पण नंतर
पुढच्या प्रवेश परीक्षा सुरु होतात. एम.बी.ए... लॉ... परदेशी विद्यापीठांच्या
प्रवेश परीक्षा... आपलं सगळं आयुष्य कॅट, सॅट, मॅट, जीमॅट अशा अनेक शॉर्टफॉर्ममुळे
व्यापून जातं. आणि हे सर्व निर्णय आपले आई-वडील, इतर नातेवाईक, हितचिंतक आणि
मित्रमंडळी या सगळ्यांच्या सर्वसहमतीने घेतले जातात. या सर्वसहमतीच्या भानगडीत
आपल्याला स्वतःला नक्की काय करायचं आहे हा प्रश्न बाजूला पडतो. आणि या सर्व
निर्णयांची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर नसल्यामुळे त्यांच्या परिणामांचीही जबाबदारी
आपण घेत नाही. निर्णय योग्य ठरला तर ‘परमेश्वराची कृपा’ आणि चुकीचा ठरला तर ‘मला
योग्य वेळी चांगला गाईडन्स मिळाला नाही’ असं म्हणायला मी मोकळा.”
“पण मग आता...”
“आता काय... आता निर्णय घ्यायचा. निर्णय घेण्यापूर्वी
आपल्या दृष्टीनं सर्व बाजूंचा विचार करायचा. आणि मुख्य म्हणजे आपल्या निर्णयाची
जबाबदारी आपणच घ्यायची. जास्तीत जास्त काय होईल? आपला निर्णय चुकेल...”
“पण मग तेवढा वेळ वाया नाही का जाणार?”
“वाया जाईल का? मी जे करायचं ठरवलं ते करण्यात मी अयशस्वी
झालो तर माझा वेळ वाया जातो का? की माझं थोडं अधिक शिक्षण झालेलं असतं? आपल्याला
जे साध्य करायचं आहे ते करायला अजून थोडं चालावं लागेल. पण आपण जे करतो आहोत ते
आपल्याला करायचं आहे की नाही हे कळायला तर मदत होईल की नाही?”
“हो... पण आजच्या आधुनिक आणि वेगवान जगात असा वेळ घालवायचा
म्हणजे...”
“जे आपल्याला करायचंच नाही ते आयुष्यभर केल्यानंतर आणि साठी
उलटल्यानंतर ‘मला खरं म्हणजे वेगळंच आयुष्य काढायचं होतं’ असं म्हणण्यापेक्षा
आत्ताच थोडा जास्त वेळ घेतला तर काय हरकत आहे...?”
“नाही... हरकत नाही... पण...”
“पण स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची भीती वाटते! जोपर्यंत आपण
या भीतीवर मात करत नाही तोपर्यंत आपण आपल्याकडून फारश्या अपेक्षाही ठेवू शकत नाही.
मी आयुष्यभर अत्यंत भित्रेपणानं वावरणार आणि आयुष्यभर ‘मी जर अमुकतमुक क्षेत्रात
असतो ना तर कुठच्या कुठे गेलो असतो’ असं सांगण्यात सगळा वेळ घालवणार...”
“पण असा निर्णय धाडकन घ्यायचा म्हणजे अवघडच आहे...”
“सोप्या गोष्टी कुणीही करेल नाही का? आणि धाडकन वगैरे काही
नाही. भरपूर वेळ घे. आयुष्य ही काही घाईघाईनं संपविण्याची गोष्ट नाही.”
‘हं... “ बंडूनं दीर्घ सुस्कारा टाकला आणि शून्यात नजर
लावली. मी त्याला त्याच्या विचारात सोडून चहा करायला स्वयंपाकघराकडे वळलो.
(क्रमशः)
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)
No comments:
Post a Comment