“मला वाटतंय, म्हणजे तूर्तास तरी माझं ठरलंय की मला
कलाक्षेत्रातच करिअर करायचं आहे. आणि ते पण अभिनयातच. म्हणजे माझं ध्येय मी ठरवलंय
असं आपण म्हणू शकतो.” इति बंडू.
“व्हेरी गुड. आता मला असं सांग की अभिनय करणं ही तुझी गरज
आहे असं तुला वाटतं का? आणि वाटत असेल तर तसं का वाटतं?” मी.
“मला माहीतच होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार. आणि
त्यामुळे मी त्याचाही विचार केलाय. माझं उत्तर आहे, ‘होय. अभिनय करणं ही माझी गरज
आहे.’ तशी ती गरज का आहे याचं उत्तर शोधायला मला जरा कष्ट पडले, पण मला वाटतंय की
माझ्या हाती काहीतरी लागलय.” बंडू.
“मग सांग बघू काय ते...” मी.
“मला असं वाटतं की मला काहीतरी म्हणायचंय. पण म्हणजे नुसतं
भाषण द्यायचं नाहीये. मला जे वाटतं ते इतरांना सांगण्याची मला अतिशय उत्सुकता
असते. आणि एवढंच नाही तर मला त्यावर इतरांची प्रतिक्रिया पण हवी असते. आणि गम्मत
म्हणजे मला जे सांगावसं वाटतं ना, ते काही दर वेळी उपदेशपर किंवा माहितीपरच असतं
असं नाही बरं का. काही वेळा एखादा ललित लेख वाचल्यावर मनात येणारे विचार किंवा
एखादी कविता वाचताना येणारा अनुभव यांसारख्या गोष्टीपण असतात. आणि मग हा अनुभव
सांगण्यासाठी फक्त शब्द पुरे पडत नाहीत. काही गोष्टी प्रत्यक्ष करून दाखवाव्यात
असं वाटतं. वर्तमानापत्रामधली एखादी बातमी वाचल्यावर प्रचंड संताप येतो. हा संताप
व्यक्त करण्यासठी भाषण काय देणार? मी संतापलो आहे असं सांगणार का...? पण मी जर
अभिनय करत असेन तर मी संतापलो आहे हे न बोलता सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू
शकतो. कदाचित केवळ एखादा लुक किंवा मानेची किंचितशी हालचाल त्यासाठी पुरेशी ठरेल.
आणि स्वतःला अशा पद्धतीनं व्यक्त करणं ही माझी गरज आहे...”
“व्वा! तू आज खूपच विचार करून आलेला दिसतोयस...”
“हो मग...! तुम्ही एवढे दिवस इतक्या गोष्टी सांगताय आणि
इतके प्रश्न विचारताय की मला विचार करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.”
“हं. मग आता पुढची पायरी काय आहे?”
“आता हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरु करणे ही पुढची
पायरी आहे. आणि या पायरीपाशी मी जरा अडलेलो आहे.”
“का बरं?”
“कारण प्रयत्न
म्हणून मला जे काही सुचतंय ते तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे मी काय करणार यापेक्षा
इतरांनी काय केलं पाहिजे या दिशेनं जास्तं जातंय.”
“पण तू करू शकतोस अशी कोणती गोष्ट आहे?”
“वाचन. मी वाचन करू शकतो!”
“अरे? मागच्या वेळेला तर तू माझ्याशी वाद घालत होतास की
सारखं सारखं काय वाचायला सांगता म्हणून...”
“हो... पण ते करावंच लागणार हे मला नीट कळलंय!”
“अजून काय करायला हवं सांग बघू...”
“तेच तर कळत नाहीये. अजून अनुभव घ्यायला हवा. पण अनुभव
घ्यायचा म्हणजे कुणीतरी मला नाटकात घ्यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा सगळं इतर
कुणावरतरी अवलंबून...”
“पण अनुभव घेण्यासाठी अन्य कोणतेच मार्ग नाहीत का?”
“नाहीत ना...”
“का बरं? तू रीतसर एखाद्या नाट्य विद्यालयात जाऊ शकतोस.
किंवा एखाद्या विद्यापीठाच्या
नाट्य विभागात प्रवेश घेऊ शकतोस.”
“छे... अभिनय असा शिकवता येतो असं मला नाही वाटत! अभिनय असा
शिकवणं शक्यच नाही.”
“का बरं...?”
“का म्हणजे काय? नट हा जन्मजात नट असतो! नट हा जन्मावा
लागतो... तो असा शिकवून वगैरे तयार करता येत नाही काही...!”
“असं? मला सांग बंडू... या जगात तुला दुसरं काहीही करायचं
असलं तर तुला त्याचं रीतसर शिक्षण घ्यावं लागतं. उद्या अचानक दवाखाना सुरु करून
म्हणशील का की आता मी इतरांवर उपचार करायला सुरुवात करतो म्हणून? किंवा काहीही
शिक्षण न घेता तुला वकील, इंजिनिअर, सी.ए., एम.बी.ए. यातलं काहीतरी होता येतं का?”
“अं... नाही... पण...”
“पण काय?”
“पण म्हणजे या गोष्टींमध्ये फरक आहे.”
“असा कुठला फरक आहे ज्यामुळे तुला असं वाटतं की कला ही काही
शिकण्याची गोष्ट नाही? आणि विशेषतः अभिनयात असं काय आहे की जे न शिकता येऊ शकतं?
इतर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं. कलेमध्ये सुद्धा
नृत्य, संगीत शिक्षण घेतल्याशिवाय येत नाही. एखादा मुलगा किंवा मुलगी असं अचानक
जाहीर करू शकतं का की मी आता गाण्यात करिअर करणार आहे आणि पुढच्या महिन्यात माझी
मैफल आहे? किंवा मला भरतनाट्यम फार आवडतं आणि मी आता पुढच्या महिन्यात अरंगेत्रम
करणार आहे? त्यासाठी काही वर्ष शिकावं लागेल हे आपण मान्य करतो. मग अभिनयामध्ये
असं काय आहे की ज्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की हे मला न शिकता सुद्धा येऊ
शकेल? अभिनय म्हणजे फक्त स्वच्छ बोलता येणं आणि मला बोलता येतंच, त्यामुळे मला
अभिनय येतोच! मग शिकायचं काय त्यात असं वाटतंय का तुला?”
“अं... मी याचा असा विचार केलाच नव्हता...”
“मग आता कर. कलेचा ध्यास घ्यावा लागतो, कलेची साधना करावी लागते
वगैरे सगळं आपण म्हणतो, पण कलेचं, आणि विशेषतः अभिनयाचं, शिक्षण घेण्याची कल्पना आपल्याला
पटत नाही. असं का बरं होतं?”
“अं... मी याचा खरंच विचार केला नव्हता. मला अजून थोडा वेळ लागेल
या विषयावर माझं मत मांडायला.”
“हरकत नाही. हवा तेवढा वेळ घे. आपल्याला काहीच घाई नाही. अति
घाई, संकटात जाई हे फक्त हायवेवरच लक्षात ठेवायचं असतं असं नाही काही! आयुष्यातही अति
घाई, संकटात जाई हे लक्षात ठेवायला हवं! जेंव्हा तू म्हणशील तेंव्हा पुहा भेटूया!”
(क्रमशः)
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स)
No comments:
Post a Comment