असे अनेक बंडू आणि बंडी मला नित्यनेमाने भेटत असतात.
प्रश्न फारसे बदलत नाहीत, उत्तरे मात्र अधिकाधिक गुंतागुंतीची (कॉम्प्लेक्स) होत
चालली आहेत. जगण्याची गती आणि तऱ्हा बदलते आहे! कलाक्षेत्रातले व्यवहार सुद्धा
बदलत आहेत. समाजाच्या दृष्टिकोनातही काही प्रमाणात फरक होतो आहे. मात्र या
क्षेत्रातली अनिश्चितता काही बदललेली नाही, बदलण्याची शक्यताही नाही.
यामधला महत्वाचा भाग असा की ज्याक्षणी आपण असं
म्हणतो की मी आता पूर्णवेळ अभिनय करणार त्याच क्षणी ‘अभिनय’ करण्याचं उद्दिष्ट बदललेलं
असतं. आता अभिनय हा व्यवसाय झालेला असतो. आणि इथेच गल्लत व्हायला सुरुवात होते. ‘मी एक कलावंत आहे आणि मी काही
माझी कला विकायला काढलेली नाही’ असं म्हणायला आपल्याला आवडतं. पण जेंव्हा मी ‘कला’ ही गोष्ट ‘व्यवसाय’ म्हणून स्वीकारतो तेंव्हाच मला
विक्रीचा विचार करणं आवश्यक होऊन बसतं. मी माझी कला सादर करण्याचा मोबदला मागणार
आहे. आणि तो मोबदला हे माझे जीविताचे साधन आहे हे एकदा मान्य केल्यावर मोबदला
घेण्यात कमीपणा वाटण्याचे कारण नाही. खरं तर असं होत असतं की मोबदला तर हवा असतो,
पण तरीही मी काहीच विकलेले नाही असा विचार सुद्धा अबाधित राहायला हवा असतो. इंग्रजीमध्ये
ज्याला ‘ट्रॅन्झॅक्शन’ म्हणतात त्यालाच मराठीत देवाण
घेवाण म्हणतात! काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही हा व्यवहाराचा नियम आहे. पण
कलेचा मोबदला आपण वेगळ्या – आणि उच्च – पातळीवर ठेवू पहात असतो. त्याला व्यावहारिक मोबदला
म्हणायला कचरत असतो. त्यामुळे हा व्यवहार ‘इगो’चा होऊन बसतो. माझा इगो सुखावेल अश्या पद्धतीनं मला मोबदला
हवा असतो. इगो सुखावला तर त्याला ‘व्यवहार’ न म्हणता मी ‘माझ्या कलेची कदर’ म्हणू लागतो. आणि मग घोटाळा व्हायला सुरुवात होते.
कलेच्या या व्यवहारात असणारा एक महत्वाचा फरक म्हणजे
कलात्मक अभिव्यक्ती ही काही वस्तू नसते. प्रॉडक्ट नसते. ही माझी वस्तू मी तुम्हाला
दिली आणि त्याची किंमत तुम्ही मला द्यायची असा सरळ सोपा व्यवहार इथे नसतो. तसंच ती
काही सेवाही नसते. सर्व्हिस नसते! मी तुम्हाला अमुक एक सेवा पुरवली आहे आणि त्या
सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मला त्याची किंमत द्यायची असाही हा व्यवहार रहात
नाही. कलात्मक अभिव्यक्तिचं समाजाच्या जगण्यातलं स्थान नेमकं काय हे आपलं ठरलेलं
नाही. त्यामुळे कलात्मक आस्वादामुळे माझा काय फायदा होतो याचा समाज म्हणून किंवा
रसिक म्हणून आपण फारसा विचार करत नाही. दोन घटका करमणूक, मनोरंजन इतपतच त्याची
किंमत. त्याचे पैसे तरी किती द्यायचे...! आणि या वातावरणाचा परिणाम कलावंताच्या
विचारांवर होत राहतो. अनेकदा अनेक कलावंताच्या कडून ते फसवले गेल्याच्या सुरस
कहाण्या आपण ऐकतो. याची परिणीती बहुधा कुणावरच विश्वास न टाकण्यात होत असते.
म्हणजे व्यवहार करण्यासाठी ‘दाखवता’ येईल अशी वस्तू नाही, सेवा नाही, आणि शिवाय फसवणुकीची
भीती! म्हणजे अनिश्चिततेची निश्चित शाश्वती!
तसंही कलेचं क्षेत्र खूप अवाढव्य आणि अस्ताव्यस्त
आहे. त्यात शिस्त नाही. ती फारशी असूही शकणार नाही. आणि या अस्ताव्यस्त विश्वाला
एक ठराविक चौकट नाही. त्यामुळे चौकटीत राहिलं तर ठराविक गोष्टी घडणारच अशी खात्री
नाही. उदाहरणार्थ एखादा बंडू इन्जिनीअर झाला आणि एखाद्या कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून
लागला तर त्याला त्याच्या प्रवासाचा सरधोपट का होईना पण मार्ग माहित असतो. ट्रेनी
इन्जिनिअर, सुपरव्हायजर, मॅनेजर, प्लांट मॅनेजर, जनरल मॅनेजर इत्यादींची शिडी
ठरलेली असते. कलेच्या क्षेत्रात असं काहीच नसतं. तुमचा मार्ग तुम्हालाच आखायचा
असतो. तुमची शिडी तुम्हालाच तयार करायची असते आणि आपली आपणच चढून बघायची असते.
प्रत्येक वेळी शिडी चढल्यावर ती मोडणार नाहीच याचीसुद्धा खात्री नसते. किंबहुना
कलेच्या क्षेत्रातली शिडी सातत्यानं चढत राहाण्याची असते.
प्रत्येक बंडू आणि बंडीच्या समोर हे सगळे विचार आणि
त्यातून निर्माण होणारे गुंतागुंतीचे प्रश्न उभे ठाकत असतात. आणि या सगळ्या
प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अपरिचिताच्या प्रदेशात मुशाफिरी करायची त्यांची
तयारी असते. पण अनेकदा बंडूच्या आई बाबांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच हवी
असतात. बंडीच्या आई बाबांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच हवी असतात.
त्यांच्या मनात त्यांची उत्तरं ठरलेली असतात. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची
चिंता त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिल्यामुळे वाढलेली असते! तरुण बंडू किंवा
बंडीच्या बेदरकारपणाची, तारुण्य सुलभ उत्साहाची भीती वाटत असते. आपला बंडू किंवा
बंडी अपयशाच्या गर्तेत जाऊ नये याची स्वाभाविक काळजीही असते. नेमक्या याच वेळी ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’ हा सुविचार अतिशय कुविचार वाटू
लागतो. आपल्या बंडू किंवा बंडीच्या नशिबी अपयश अजिबात नको हा विचार मूळ धरू लागतो.
बंडू पडला तर तो परत उठू शकेल का अशी चिंता वाटू लागते, किंबहुना उठूच शकणार नाही याचीच जणू खात्री वाटत राहते.
इतर अनेक क्षेत्रातल्या उपद्व्यापी बंडूंचं आपण खूप
कौतुक करतो. पण कलेच्या क्षेत्रातल्या बंडू बंडींना मात्र पुष्कळच जास्त कष्ट
पडतात. ते एका दृष्टीनं चांगलंच आहे. स्वतःला तावून सुलाखून घ्यायला हा वेळ खूप कामी
येतो. आयुष्यात पुढे येणाऱ्या अनेक प्रसंगांना तोंड द्यायचं बळ याच काळात मिळत
असतं. पण अतिशय विश्वासानं ‘पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा’ असं म्हणू इच्छित असलेल्या या
बंडू-बंडीच्या पाठीत दणके मिळण्याची शक्यता
अधिक असते.
अश्या बंडूंना आणि बंडींना, त्यांच्या
प्रयोगशीलतेला, त्यांच्यातल्या उद्योगीपणाला, त्यांच्यातल्या या कलात्मक
उद्यमशीलतेला सकारात्मक, सजग प्रतिसाद देणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
बंडू-बंडीच्या आईबाबांची आणि आपल्या सगळ्यांची सुद्धा.
(समाप्त)